महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समिती
By admin | Published: August 10, 2015 01:12 AM2015-08-10T01:12:32+5:302015-08-10T01:12:32+5:30
लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीवर तरुणाकडून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा
मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीवर तरुणाकडून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला. याची गंभीर दखल रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सात दिवसात अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात नवीन निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय (लोहमार्ग) यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुरुवारी रात्री बोरीवली ते चर्चगेट या जलद लोकलमधून जाणाऱ्या २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न तरुणाने केला. या प्रकरणी आतापर्यंत २0 हून अधिक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त (लोहमार्ग)मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा आम्ही घेणार आहोत. यासाठी एक पोलिस उपायुक्त आणि एक महिला सहाय्यक पोलिस आयुक्त यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यानंतरच महिला डब्यातील सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. महिला डब्यातील सुरक्षा वाढवणे, सध्याच्या वेळेत बदल करणे याबाबत समितीने सादर केलेल्या अहवालनंतरच निर्णय घेण्यात येईल.