पेट्रोल चोरी रोखण्यास समितीचे गठण!
By admin | Published: June 22, 2017 05:22 AM2017-06-22T05:22:36+5:302017-06-22T05:22:36+5:30
पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकरण ठाण्यात उघडकीस आल्यानंतर राज्याचे वैध मापन शास्त्र विभाग अधिक सतर्क झाले आहे.
चेतन ननावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेट्रोल व डिझेल चोरीचे प्रकरण ठाण्यात उघडकीस आल्यानंतर राज्याचे वैध मापन शास्त्र विभाग अधिक सतर्क झाले आहे. मापात माप करणाऱ्या पेट्रोलपंपांवरील डिस्पेन्सींग युनिटची पडताळणी व मुद्रांकन करताना युनिटमधून गैरप्रकार करता येऊ नये, म्हणून पडताळणी व मुद्रांकनाची विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करून ती सादर करण्यासाठी विभागाने एक समिती गठीत केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना २३ ते २९ जूनदरम्यान डिस्पेन्सरमधील अनुचित प्रकार रोखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वैध मापन शास्त्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलपंपांवरील चीप आणि रिमोटच्या मदतीने होणाऱ्या चोरीची गंभीर दखल केंद्र शासनाने घेतली. शिवाय, असे अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व राज्यांतील वैध मापन शास्त्र यंत्रणेतील निवडक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्लीच्या इंडियन इन्स्टीट्युट आफ पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशन याठिकाणी २९ मे रोजी बोलावले होते.
यासंदर्भात वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता म्हणाले की, पेट्रोलपंपावरील युनिटमधून गैरप्रकार होऊ नये, या अनुषंगाने पडताळणी व मुद्रांकनाची विशिष्ठ कार्यपद्धती निश्चित करून ती सादर करण्यासाठी नाशिक विभागाचे उप नियंत्रक एस.टी. चालिकवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये मुंबई महानगर विभागाचे उपनियंत्रक बी.के. झावरे, ठाणे जिल्ह्याचे सहायक नियंत्रक एफ.एम. इनामदार, अंधेरी विभाहाचे निरीक्षक बी.जी.आण्णापुरे हे सदस्य असतील. ही समिती आधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेल्या बदलांचा अभ्यास करेल. त्यात खासकरून पेट्रोल व डिझेल डिस्पेंन्सिंग युनिटची पडताळणी, फेरपडताळणी व मुद्रांकन करताना अवलंबणारी कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाईल. शिवाय संपूर्ण अहवाल २९ जूनपर्यंत सादर करेल.