गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती स्थापणार- तावडे
By Admin | Published: March 9, 2015 06:00 AM2015-03-09T06:00:10+5:302015-03-09T06:00:10+5:30
गड-किल्ले हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा असून आमचे सरकार गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे.
मुंबई : गड-किल्ले हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा असून आमचे सरकार गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. या अमूल्य ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.
महाराष्ट्रात तब्बल ३५० किल्ले आहेत. यापैकी ४९ किल्ले राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारने संरक्षक स्मारक घोषित केलेल्या किल्ल्यांची संख्या ही ४७ इतकी आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबतही योग्य पाठपुरावा करेल असे सांगतानाच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये निनाद बेडेकर, ऋषिकेश यादव आदी तज्ज्ञ मंडळींचा समावेश असेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
केंद्राकडे किल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी असून केंद्राच्या अखत्यारीतील किल्ल्यांसाठी राज्याकडून नक्कीच पाठपुरावा करणार असून, खासगी किल्ले जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करण्यात येतील, तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)