समिती करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 03:46 AM2017-01-21T03:46:32+5:302017-01-21T03:46:32+5:30

मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे.

Committee will be fasting | समिती करणार उपोषण

समिती करणार उपोषण

Next


पारोळ : मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच गावे विकासाच्या नावाने या आराखड्यात समाविष्ट करून त्यांचे लचके तोडण्याचे कारस्थान शिजले आहे. त्या विरोधात ३० जानेवारीला तहसीलदार कचेरीसमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन उपोषण करण्यात येणार आहे.
यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.
हरकती येऊ नये व आराखडा विरोधी आंदोलनाला खिळ बसावी म्हणून बुद्धीभेद करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळी न पडता भूमीपूत्रांना रस्त्यावर आणणाऱ्या आराखड्याविरोधात हरकती मोठ्या प्रमाणात नोंदवाव्यात,असे जाहिर आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी वसई येथे केले.
मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी वसईतील पर्यावरण संवंर्धन समितीतर्फे वसईत सभांद्वारे जनजागरण मोहिम राबविण्यात येत असून, मंगळवारी पापडी येथील थॉमस बाप्टीस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात सभा पार पडली.
फा.जोएल डिकुन्हा अध्यक्ष होते. फा. ज्यो आल्मेडा ,फा.नाझरेथ गब्रु, समीर वर्तक, फा.सालोमन रॉड्रीग्ज मंचावर होते. चंद्रशेखर प्रभू म्हणाले की,परवडणारी घरे द्यायच्या गोंडस घोषणेसोबत विकासाच्या भूलथापा असलेला हा आराखडा समाज पोखरणारे षडयंत्र असून, परदेशातून कोट्यावधी रूपये यावेत, जगातल्या धन-दांडग्यांना मुंबई व मुंबई लगतची आपली उपनगरे पार्कींग झोन करता यावीत, याची तरतूद या आराखड्यात केलेली आहे. हरित पट्टयांमध्येही ८ मजली २४ मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जाणार असून, डोंगर उध्वस्त करून ,सखल जमीनीत भराव करण्याची मुभा या आराखड्यात असणार आहे. सुरवातीला आराखड्यात समाविष्ट नसलेली गावे महापालिकेच्या ठरावानंतर मात्र आराखड्यात घेता येणार असून ,यासाठी महापालिका सज्ज आहे. गावा-गावांतून ७५ हजार वाहनांची वाहतूक करणारा कोस्टल रोड किंवा घर-दारे उद्ध्वस्त करणारी मेट्रो आम्हाला नको असून, त्यासोबतच येणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे जंगलही आंम्हाला नको आहे. भिवंडी, वाडा या भागातही आराखड्याविरोधातील आंदोलन जोर धरते आहे. वसईकरांनीही मुदत संपण्यापूर्वी आपल्या हरकती जास्तीत जास्त संख्येने नोंदवाव्यात ,असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क हिरावणाऱ्या या विकास आराखड्याची खलबते २०१२ पासून सुरू असून, हरित पट्टयातही रासायनिक कारखाने व अन्य औद्योगिकरणास चालना नव्या आराखड्यात दिली जाणार आहे, असा दावा यावेळी केला गेला. (प्रतिनिधी)
>प्रत्येक कुटुंबातील १ व्यक्ती व्हावी आंदोलक
या विकासाने वसईच्या पर्यावरणावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने वसईकरांनी संघटीत होऊन या बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्यास विरोध करण्याची वेळ आली आहे. सभेचे प्रास्तविक प्रा.जॉना वाझ यांनी केले. समीर वर्तक यांनी ही ३९ वी सभा असल्याचे सांगीतले. बिल्डरांसाठी केलेल्या या आराखड्यास विरोध करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकतरी व्यक्ती सक्रिय झाली पाहिजे , असे यावेळी आवाहन केले गेले.

Web Title: Committee will be fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.