समित्यांतील आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 05:38 AM2016-11-10T05:38:46+5:302016-11-10T05:38:46+5:30

शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनामधून बाद केल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकवरही झाला आहे

Committees fall in arrivals | समित्यांतील आवक घटली

समित्यांतील आवक घटली

Next

मुंबई/नवी मुंबई : शासनाने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनामधून बाद केल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकवरही झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले होते. तर दुसरीकडे मुंबई बाजार समितीत एका दिवसामध्ये तब्बल २१४३ टन आवक कमी झाली. रद्द केलेल्या नोटा घेण्यावरून काही वेळ संभ्रम निर्माण झाला होता. भाजी व फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उधारीवर व्यवहार करण्यात आले. तर दुसरीकडे ५०० व हजाररुपयांच्या नोटा घ्यायच्या की नाही याविषयी स्पष्ट माहिती नसल्यामुळे एपीएमसीमध्ये गोंधळ झाला होता.
बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केटमधील व्यवहार पहाटे सुरू होत असतात. ग्राहकांनी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा आणल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. पण व्यवहार ठप्प होत असल्यामुळे अखेर पैसे स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. जे खरेदीदार वर्षानुवर्षे मार्केटमध्ये येत आहेत त्यांना उधारीवर माल देण्यात आला. मार्केटमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनीही माल कमी प्रमाणात विक्रीसाठी पाठविला होता. ८ नोव्हेंबरला १३३२ टन भाजीपाला विक्रीला आला होता, पण बुधवारी १२१५ टनच माल आला होता. फळ, कांदा, धान्य व मसाला मार्केटमध्येही आवक कमी झाली आहे. कांदा - बटाटा मार्केटमध्ये बाजारभाव थोड्या प्रमाणात वाढला तरी इतर मार्केटमध्ये मात्र भाव जैसे थे होते.


खान्देशातील उलाढाल ठप्प
जळगाव/धुळे/नंदुरबार : बुधवारी खान्देशातील बाजार समित्यांमध्ये कामकाज झाले नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जळगाव बाजार समितीत नाफेडतर्फे उडीद खरेदी सुरु झाली. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री, शिरपूर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. धुळे बाजार समिती दोन दिवस बंद राहणार आहे.

‘केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारी’
पारनेर (अहमदनगर): केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाचशे व एक हजाराच्या चलनातील नोटा बंद केल्याचा निर्णय क्रांतिकारी व स्वागतार्ह आहे. त्यामुळे काळा पैसा बाहेर येईलच शिवाय भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीव्यक्त केला.
अण्णांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. अण्णा हजारे यांनी या नोटा बंद करण्याचा सातत्याने आग्रह धरला होता. राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. दहशतवादी हा पैसा वापरत असतील तर त्यांनाही चांगलीच चपराक बसेल.
या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. अचानक हा निर्णय जाहीर केला, ही चांगली बाब असल्याचे अण्णा म्हणाले. आता राजकीय पक्षांना वीस हजारांपेक्षा अधिकच्या देणग्या जाहीर करणे बंधनकारक करावे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांचा खर्च व देणग्यांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणीही अण्णांनी केली.

पंढरीत आलेल्या वारकऱ्यांपुढेही पेच!
सचिन कांबळे, पंढरपूर
पाचशे-हजाराची नोट कनवटीला खोचून भूवैकुंठी पंढरपूरात कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भक्तांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून परतायचे म्हटले तरी भाडेखर्चाचा प्रश्न कसा सोडवायचा, अशा विवंचनेत अनेक वारकरी असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले.
पंढरपूरात शुक्रवारी कार्तिकी यात्रा आहे. त्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यांनी पंढरपुरातील लॉज किंवा धर्मशाळेत मुक्काम ठोकला आहे. परंतु अचानक हा निर्णय झाल्याने चालणारे चलन कुठून आणायचे, असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे. हॉटेल, लॉज, भक्तनिवास, खेळणी, गाड्या, प्रसाद साहित्य व विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी रात्रीपासूनच ५०० व हजाराच्या नोट्या घेण्याचे बंद केले आहे. यामुळे अनेकांना सकाळचा चहाही घेता आला नाही. पंढरपुरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानात ‘५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद’ असे फलक लावल्याने अनेक ठिकाणी सुट्या पैशावरून वारकऱ्यांशी वाद झाले.

आम्ही २२ जण कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी सहकुटुंब आलो आहोत. परंतु काल रात्रीपासून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने मोठी पंचाईत झाली आहे. गावी परत जायचे म्हटले तरी भाडेखर्चाची तजवीज करावी लागणार.
- प्रशांत मेरस, वारकरी,
(रा. साखरखेरडा, जि. बुलडाणा)

देणगीवरही परिणाम
या निर्णयामुळे विठ्ठल-रखुमाई मंदिरात येणाऱ्या देणग्यांवरही परिणाम झाला आहे. देणगी स्वीकारण्यास पुणे येथील विठ्ठल सेवा मंडळाचे १२० स्वयंसेवक दाखल झाले होते़ ते मंदिरासह परिसरात स्टॉलच्या माध्यमातून देणगी स्वीकारत आहेत़ मात्र ५०० व १००० रुपयांची नोट घेऊन उर्वरित पैसे देण्यास स्वयंसेवकांकडून असमर्थता व्यक्त केली जात होती.

Web Title: Committees fall in arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.