नेक्स्टविरोधात एमबीबीएस विद्यार्थ्यांचा उद्या कॉमन बंक
By admin | Published: January 31, 2017 08:26 PM2017-01-31T20:26:07+5:302017-01-31T20:26:07+5:30
विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला देशातील सर्व एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा तर भारतात एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला देशातील सर्व एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दिला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या बुधवारी नागपुरातील मेयो, मेडिकल व एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी महाविद्यालयात सामूहिक गैरहजर (कॉमन बंक) राहून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहे.
मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती वैद्यकीय विद्यार्थी संघटनेचे शीव जोशी यांनी दिली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, डॉ. व्हाय. एस. पांडे, डॉ. प्रशांत राठी, अक्षय यादव व सदाफ आझम उपस्थित होते. शीव जोशी म्हणाले, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा देण्याचा व भारतातील विद्यार्थ्यांनी साडेचार वर्षे एमबीबीएसची कठीण परीक्षा पास केल्यानंतर केवळ गुणवत्तेच्या नावावर नेक्स्ट परीक्षा घेणे चुकीचे आहे. याचा अर्थ भारतात देण्यात येणारे वैद्यकीय शिक्षण उच्च दर्जाचे नाही, असे केंद्र सरकारला वाटते का ?, भारतात शिक्षण घेणाऱ्यांना अशी दुजाभावाची वागणूक मिळणार असेल, तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल हा विदेशात शिक्षण घेण्यावर राहील. एकीकडे राष्ट्रीयत्व आणि स्वदेशी यांचे गुणगान गायचे आणि दुसरीकडे असे निर्णय घ्यायचे, हे खेदजनक आहे, असे परखड मत जोशी यांनी मांडले.
यादव म्हणाले, रशिया, जर्मनी, चीन यांसह अन्य देशांतून वैद्यकीय पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र वैद्यकीय पदवी परीक्षा द्यावी लागते. यानंतरच ते देशात वैद्यकीय व्यवसाय करू शकतात. विधेयक लागू झाल्यास अशा देशांमधून शिकून आलेले विद्यार्थी कोणत्याही परीक्षेशिवाय भारतात वैद्यकीय व्यवसाय करू शकतील. हे भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
डॉ. व्हाय.एस. पांडे म्हणाले, हा निर्णय भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुळावर उठणारा आहे. मुळात भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्यास जाऊच नयेत, यासाठी शिक्षणक्षेत्राचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. शासनाचा हा निर्णय विरोधाभासी आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ताच पहायची असेल तर एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा ही देशात एकच लागू करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. डॉ. अविनाश जोशी म्हणाले, नेक्स्ट परीक्षेला आयएमएचा विरोध असून या संदर्भात होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा आहे. उद्या बुधवारी सकाळी १० वाजता आयएमएमध्ये मेयो, मेडिकल व एनकेपी साळवे महाविद्यालयाचे एमबीबीएसचे विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करतील. नंतर ११ वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देतील.