‘कॉमन मॅन’ पोरका झाला

By Admin | Published: January 28, 2015 05:02 AM2015-01-28T05:02:04+5:302015-01-28T05:07:26+5:30

मला आर. के. लक्ष्मण यांचे दीर्घ साहचर्य लाभले हे माझे सद्भाग्य. त्याहीपेक्षा एक अनोखा विशेषाधिकार मला टाइम्स आॅफ इंडियाच्या सेवेत असल्याने मिळाला.

The common man became a 'porka' | ‘कॉमन मॅन’ पोरका झाला

‘कॉमन मॅन’ पोरका झाला

googlenewsNext

राम तरनेजा(टाइम्स आॅफ इंडिया वृत्तपत्र समूहाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक)

मला आर. के. लक्ष्मण यांचे दीर्घ साहचर्य लाभले हे माझे सद्भाग्य. त्याहीपेक्षा एक अनोखा विशेषाधिकार मला टाइम्स आॅफ इंडियाच्या सेवेत असल्याने मिळाला. तो असा, की टाइम्सच्या अंकात असंख्य वाचकांना लक्ष्मण यांचे जे व्यंगचित्र पाहायला मिळायचे, ते मला आदल्या दिवशी छपाईला जाण्यापूर्वी बघायला मिळायचे. तो जसा विशेषाधिकार होता तसा आनंदाचा विषयही होता. कॉमन मॅनला असामान्यत्व बहाल करणाऱ्या लक्ष्मण यांच्या व्यक्तिमत्त्वात एक तितकीच असामान्य वल्ली दडलेली होती. त्याची प्रचिती देणारी अनेक रूपे मला टाइम्सच्या सेवेत असताना आणि नंतरही वेळोवेळी पाहायला मिळाली.

ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ख्यातकीर्त होते. तीच त्यांची ओळखही होती. पण माझ्या मते, ते आधी हाडाचे पत्रकार होते. राजकीय लिखाण, त्यावरील भाष्य याचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. म्हणूनच राजकीय बातमीवर अगदी मोजक्या शब्दांत विलक्षण प्रभावी भाष्य करण्याची किमया त्यांना साधली. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी जे लोकांपर्यंत पोहोचविले ती असामान्य पत्रकारिता होती. मी ‘बेनेट कोलमन’च्या सेवेत १९६३मध्ये कलकत्त्यात रुजू झालो. पुढे ७०च्या सुमारास मुंबईत आलो ते निवृत्तीपर्यंत़ १९७० ते १९९१ पर्यंत मला लक्ष्मण यांचे जे साहचर्य लाभले़ त्याचे वर्णन ‘सोनेरी दिवस’ असे करता येईल. मला आजही लख्ख आठवतंय. ते सहसा लंच ब्रेकमध्ये आॅफिसात थांबत नसत. ते आणि शामलाल (टाइम्सचे तत्कालीन संपादक) त्या वेळेचा वेगळ्या पद्धतीने सदुपयोग करीत असत. ते दोघेही लंच ब्रेकच्या सुमारास आॅफिसातून बाहेर पडायचे. पायी पायी फिरोजशहा मेहता रोडलगतच्या स्ट्रॅण्ड बुक स्टॉलमध्ये जायचे. तिथे स्ट्रॅण्डचे मालक टी. एन. शानभाग यांच्याशी दिलखुलास संवाद साधायचे. तो अर्थातच नवनव्या आणि संग्राह्य पुस्तकांबद्दल असायचा. जे आपल्या संग्रहात हवे असे वाटेल ते पुस्तक लक्ष्मण विकत घ्यायचे. हा अक्षरश: परिपाठ होता. त्यांचा कल स्वाभाविकपणे राजकीय लिखाण वाचण्याकडे अधिक होता.
लक्ष्मण यांचे टाइम्सच्या इमारतीतील कार्यालय हाही सीमित का होईना अभिजनांच्या एका वर्तुळात दंतकथेचा विषय बनला होता. त्यांच्या खोलीत भेटायला आलेल्या माणसाला बसण्यासाठी खुर्चीच नसायची. त्या खोलीत एकच खुर्ची, तीही स्वत: लक्ष्मण यांचीच! कुणी त्याचा अर्थ ते माणूसघाणे आहेत, असा लावला. पण प्रत्यक्षात त्यांना कार्टूनसाठीचे चित्र काढण्यासाठी ड्रॉइंग बोर्ड वापरायचा असायचा. त्यासाठी मोकळी जागा आवश्यक होती. शिवाय तसेही लक्ष्मण विनाकारण चकाट्या पिटणाऱ्यांतले नव्हतेच. तसे पाहिले तर त्यांची गणना मितभाषी माणसांमध्ये करायला हरकत नाही. लक्ष्मण यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास विलक्षण छाप होती. त्यांची प्रत्येक लकब, म्हटले तर फॅशन लक्षात राहण्याजोगी होती. काळी पॅन्ट, पांढरा बुश शर्ट, काळे बूट, गळ्यात दोरीला अडकवलेले दोन चष्मे, शर्टाला खालच्या बाजूलाही दोन खिसे ही त्यांची नेहमीची छबी. कालांतराने अधूनमधून बुश शर्टावर रंग फुलले. पण लक्षात राहिला तो त्यांचा पांढरा बुश शर्टच. हा कदाचित त्यांच्या पोशाखाच्या शिस्तीचा भाग असावा. वक्तशीरपणाच्या बाबतीत तर ते वस्तुपाठ होते. त्यांच्या कार्यालयात येण्याच्या वेळेवर घड्याळ लावता येईल, असे अनेकांचे मत होते. सकाळी नऊच्या ठोक्याला ते कचेरीत हजर असायचे. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या अंकातील कार्टूनचा विषय ते माध्यान्हीपूर्वी हातावेगळा करायचे. मग त्यांची ती फोर्टमधली पायपीट आणि पुढच्या दिवशीच्या कार्टूनच्या विषयाचे चिंतन सुरू व्हायचे. तटस्थपणे विचार करायचा, तर माझे त्यांच्याशी असलेले संबंध माझ्या दिशेने एका ज्येष्ठतम सहकाऱ्याशी जसे अपेक्षित असतात तसेच होते. पण त्यातही मित्रत्वाचे अनेक धागे काळाच्या ओघात कळत-नकळत विणले गेले.
आणीबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी तयार होणाऱ्या बातम्यांवर सरकारी सेन्सॉरशिपचा अंकुश होता. पण लक्ष्मणचे कार्टून हा सन्माननीय अपवाद होता. माझ्या माहितीनुसार, लक्ष्मण यांचे कार्टून सेन्सॉर करायचे नाही, असा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा अलिखित आदेश होता.
एक अस्सल राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ते दीर्घकाळ स्मरणात राहतील. व्यक्तिश: मला त्यांची उणीव सदैव भासत राहील. ते जाणार हे आपल्याला दिसत होत. पण ते रोखणे कोणाच्याच हाती नव्हते. अखेर विधात्याची इच्छा बलीयसी!

 

Web Title: The common man became a 'porka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.