कम्युनिस्टांचे सरकार म्हणजे राजकीय हत्याकांड
By admin | Published: June 22, 2017 05:44 AM2017-06-22T05:44:25+5:302017-06-22T05:44:25+5:30
कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात. विशेष म्हणजे या राजकीय हत्याकांडाचा कधी तपास होत नाही किंवा खुनीही सापडत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिस्टांवर टीका केली. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तक प्रकाशनानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात चार दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी)ची सत्ता आहे. तर, १९९८पासून माणिक सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राजवटीवर पत्रकार दिनेश कानजी यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर स्मारकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा आणि दाखवायचा चेहरा भिन्न आहे. देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून देशाच्या सुरक्षेशी खेळणारे आणि केंद्रातून येणारा निधी लुटणारे सरकार आहे. कम्युनिस्टांनी त्रिपुरातही राजकीय हत्याकांडे घडवली. दुर्गम प्रदेश असल्याने संपर्काच्या साधनांचा अभाव आणि मागासलेपणामुळे येथील भीषण वास्तव बाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्रिपुरातील या अराजकतेचा या पुस्तकातून पर्दाफाश झाला आहे.
माणिक सरकार म्हणजे ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आहे. या माणसांना मी एकेकाळी देवदूत समजत होतो. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिमाभंजन होऊन माणिक सरकार यांचे खरे रूप समोर येते, असे भारतकुमार राऊत म्हणाले.