दुष्काळात रेशीमगाठींचे सामुदायिक ‘कर्तव्य’भान!
By admin | Published: May 2, 2016 12:35 AM2016-05-02T00:35:51+5:302016-05-02T00:35:51+5:30
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात
- प्रताप नलावडे, बीड
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत येथील सामुदायिक विवाह सोहळे पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहेत. रेशीमगाठींच्या सामुदायिक ‘कर्तव्य’भानाची चळवळ बीड जिल्ह्यात गतिमान झाली आहे. एवढेच नव्हेतर ‘एक तिथी एक गाव’ या संकल्पनेवरही काही गावांमधून गांभीर्याने विचार सुरू आहे.
दुष्काळाने कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेने सतावले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गोरगरिबांच्या मुलांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकाच मांडवाखाली अनेक जोडपी विवाहबद्ध झाली असून, संसारोपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात मिळाल्याने त्यांच्या खर्चाचीही बचत झाली.
काही विवाह सोहळ्यांमध्ये ‘भू्रणहत्या करू नका’, ‘सुखी संसार करा’, ‘पत्नीला सुखाने नांदवा’ असे वडीलकीचे उपदेशही देण्यात आले.
परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानतर्फे ५४ जोडपी विवाहबद्ध झाली. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २२ मुलींचा विवाह झाला. उद्योजक गौतम खटोड यांनी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात हा सोहळा झाला. खटोड यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह या सोहळ्यात लावून त्याला चळवळीचे स्वरूप दिले.
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती!
१७ एप्रिलला पालवण येथील चारा छावणीत
४१ मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास आवर्जून उपस्थित राहिले. ६ हजार जनावरांना आधार ठरलेल्या यशवंत सेवाभावी संस्थेचे राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी छावणीतच मांडव उभारून भावाची भूमिका निभावली. गेवराईत आ. अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठानच्या सोहळ्यात यंदा दीड हजार वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या.
अंबाजोगाईत गवळी समाज आणि ककैय्या समाजाच्या वतीने सामुदायिक सोहळा झाला. पाटोद्यात समाजकल्याण सभापती महेंद्र गर्जे तर माजलगावात बाळू ताकट या सर्वसामान्य तरुणाने फेबु्रवारीमध्ये विवाह सोहळ्याचा खर्च उचलला.
जिल्हा बँक संचालक चंद्रकांत शेजूळ, अंबाजोगाईत मुस्लीम गवळी समाज, शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये ३० एप्रिलला तर अंबाजोगाईत वसुंधरा सेवा प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकारातून विवाह सोहळे होत आहेत.