कुडूसमध्ये सामुदायिक विवाह
By admin | Published: September 18, 2016 02:10 AM2016-09-18T02:10:20+5:302016-09-18T02:10:20+5:30
एकता सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेद्वारे अकरा जोडप्यांचा सामुदायीक विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने थाटात लावण्यात आले.
वाडा : कुडूस येथील कुडूसचा राजा या सार्वजनिक गणपती उत्सवाचे संयोजक असलेल्या एकता सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेद्वारे अकरा जोडप्यांचा सामुदायीक विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने थाटात लावण्यात आले.
या वर्षी संस्थेने अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदिवासी व बिगरआदिवासी समाजातील विवाहोत्सुक तरूण तरूणींच्या भेटी घेऊन त्यांना प्रोत्साहित करून सामुदायिक विवाहांसाठी राजी केले. या कामी संस्थेचे अध्यक्ष जयकिशोर सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालघर, जव्हार, मोखाडा व वाडा तालुक्यात संपर्क मोहिम राबविली.
संस्थेने विवाह सोहळ्यासाठी मोठा मंडप, वाजंत्री, कन्यादानासाठी भांडी, वधू वरांसाठी सलवार कुडता, साडी व शूज, चपला आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. आशिर्वाद देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे असलेल्या वाडा पंचायत समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी संस्थेने हा स्तुत्य उपक्र म राबविला आहे. या उपक्रमांचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा. या नवदापत्यांचे कन्यादान माजी उपसभापती मंगेश पाटील व त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य मेघना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या धनश्री चौधरी, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ पाटील, कुडूस ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. गिरीश चौधरी, मधुकर लाथड, सामाजिक कार्यकर्ते ईरफानभाई सुसे, रामदास जाधव, दादासाहेब मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.