आदिवासींच्या लोकशिक्षणासाठी ‘कम्युनिटी रेडिओ’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 08:34 AM2017-08-04T08:34:44+5:302017-08-04T08:36:20+5:30
लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे साक्री तालुक्यातील जेबापूर या गावात रेडिओ पांझरा (एफएम ९०़४ मेगा हर्ट्झ) हे खान्देशातील पहिले कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्यात आले आहे.
धुळे,दि.४ - लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे साक्री तालुक्यातील जेबापूर या गावात रेडिओ पांझरा (एफएम ९०़४ मेगा हर्ट्झ) हे खान्देशातील पहिले कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्यात आले आहे. या रेडिओ केंद्राचे उद्घाटन नुकतेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते झाले असून या केंद्रातून १५ आॅगस्टपासून प्रक्षेपण सुरू होणार आहे.
धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी देशबंधू व मंजू गुप्ता फाऊंडेशन व लुपिन ह्युमन वेलफेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन २०१० पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील ६४५ गावांमध्ये या संस्थेने ग्रामीण विकास व उपजिविका सुधार अंतर्गत भारत परिवर्तन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कृषी, पशुधन विकास, कौशल्य विकास, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अहिराणीसह स्थानिक भाषेत कार्यक्रम
पिंपळनेरनजीक असलेल्या जेबापूर या गावात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेने रेडिओ पांझरा हे रेडिओ केंद्र कार्यान्वित केले आहे़ अहिराणी, मावची, भिल्ल, कोकणी या स्थानिक भाषेतील कार्यक्रम हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे़
जाणीव जागृतीसह लोकशिक्षणाचा हेतू
कृषी पशुधन विकास, आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, शासनाच्या विविध योजना, महिला सबलीकरण, जलसंधारण या विषयांवर जाणीव जागृती व लोकशिक्षण हा रेडिओ केंद्राचा मुख्य हेतू आहे़ यासोबतच यामाध्यमातून आदिवासी बहुल भागातील लोककला, लोकगीत, लोकसंस्कृतीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
रेडिओ केंद्राच्या परिघात ८४ गावांचा समावेश
पिंपळनेर परिसरात असलेल्या डोंगराळ भागातील ८४ आदिवासी गावे या रेडिओ केंद्राच्या परिघात येतील़ संबंधित गावांना सद्यस्थितीत कोणत्याही रेडिओ चॅनलची सेवा मिळत नाही़ त्यामुळे त्यांना आपुलकी वाटेल असे चॅनेल सुरू करण्यात आले आहे़ हे रेडिओ केंद्र सुरू करण्यापूर्वी त्याची जनजागृती संंबंधित गावांमध्ये केली जाणार आहे़ या रेडिओ केंद्रासाठी देशबंधू मंजु गुप्ता व लुपिन फाऊंडेशनचे विशेष प्रयत्न सुरू आहेत़
प्रसारित होणारे कार्यक्रम
संतवाणी, कृषीसंदेश, आरोग्यमंत्र, युवाशक्ती, मनोरंजन, आदिवासी संस्कृती व लोककला, ग्रामोदय, स्वामिनी या प्रमुख कार्यक्रमांसह समाजातील ज्वलंत विषय, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्त्री शिक्षण याविषयी चर्चा, मुलाखत, भाषण व तज्ज्ञांच्या व सामान्य जनतेच्या स्वरात कार्यक्रम प्रसारण होणार आहे़ १५ आॅगस्टपासून दररोज सकाळी ७ तेर् १० व सायंकाळी ४ ते ७ रेडिओ प्रक्षेपण होणार आहे़
बंगळूरच्या संस्थेचे सहकार्य
सदर रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी बंगळूरच्या एका संस्थेने तांत्रिक सहकार्य केले आहे. तर पुणे येथील युनिक फिचर्स ही संस्था प्रक्षेपित होणाºया कार्यक्रमांसाठी सहकार्य करणार आहे़ रेडिओ केंद्रासाठी ३० मीटर उंच टॉवर उभारण्यात आला आहे़ दासु वैद्य यांनी या रेडिओ केंद्राचे थीमसाँग लिहिले आहे़ सुरूवातीला दिवसात ६ तास होणारे प्रक्षेपण हळूहळू वाढविले जाणार आहे़