दारु पाजून आदिवासी महिलेवर सामुहिक अत्याचार
By Admin | Published: October 17, 2016 09:34 PM2016-10-17T21:34:07+5:302016-10-17T21:36:38+5:30
आठवडी बाजारासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला दारू पाजून तिच्यावर आठ जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील शिंधी शिवारात रविवारी रात्री घडली
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १७ : आठवडी बाजारासाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला दारू पाजून तिच्यावर आठ जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील शिंधी शिवारात रविवारी रात्री घडली. या अत्याचारात सदर महिला रात्रभर बेशुद्ध अवस्थेत शेतातच पडून होती. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने सोमवारी सायंकाळी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तालुक्यातील रामपूर येथील एक २९ वर्षीय विधवा महिला रविवारी कुंभा येथील आठवडी बाजारासाठी गेली होती. बाजारात वेळ झाला. रात्र झाल्याने तिने एका आॅटोरिक्षा चालकाला गावात पोहोचवून देण्याची विनंती केली. १०० रुपये भाड्यात गावी पोहोचवून देण्याचे ठरले. यावेळी आॅटोरिक्षात दोन व्यक्ती होत्या. आॅटोरिक्ष रामपूरकडे न नेता सिंधी गावातील शेताकडे घेऊन गेले. सदर महिलेला संकटाची चाहूल लागताच तिने आॅटोरिक्षातील दोन व्यक्तींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत शेतात लपून बसली. त्यानंतर दोन मोटरसायकलीवर आणखी सहा व्यक्ती तेथे आल्या.
या आठ जणांनी लपून असललेल्या महिलेला शोधले. तिला बळजबरीने दारू पाजून आळीपाळीने अत्याचार केला. या प्रकाराने सदर महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आठही जण तेथून पसार झाले. सकाळी सदर महिलेला शुद्ध आल्यावर तिने आपले गाव गाठले. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने सकाळी कुणालाही माहिती दिली नाही. परंतु सायंकाळी तिने ही घटना नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांंनी रात्री मारेगाव पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. आठही जण तोंडाला रुमाल बांधून असल्याने तिला कुणालाही ओळखता आले नाही. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यातची कारवाई सुरू होती