कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:25 PM2024-05-31T15:25:31+5:302024-05-31T15:26:19+5:30

पुण्यातील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या रिपोर्टनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला घेर

Companies moving out of the state is the triple engine failure of the government; Attack of Supriya Sule on BJP-Shivsena-NCP Govenment | कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

पुणे - हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केला आहे. 

पुण्यातील सारसबागेसमोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला सुप्रिया सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयश समोर आलं आहे. कारण फॉक्सकॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता मात्र तो आला नाही. अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवार  यांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले. त्यात फेज-1, फेज -2, फेज-3 असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले. यासाठी देशातून लोक आले गुंतवणूक केली. मात्र आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहात आहेत असा आरोप त्यांनी केला. 

तसेच आयटी पार्कच्या पायाभूत सुविधा, पाण्याचा प्रश्न यासाठी मी स्वतः अनेकदा तिथे बैठका घेतल्या आहेत. अनेकदा पालकमंत्र्यांकडे चर्चा केली आहे, औद्योगिक सचिव, एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासोबत बैठका केल्या आहेत. तिथले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही. हे सरकार फक्त घरं फोडा , इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात इतकी व्यस्त आहे की त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडे त्यांना पाहायला वेळ नाही अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आपण आदर्शमाता म्हणून बघतो. अगदी लहान वयात त्यांच्यावर एक प्रसंग घडला पण त्या खचल्या नाहीत. एक आदर्श जीवन त्या जगल्या आणि लढल्या. त्यांनी हार मानली नाही. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर या आमच्या आदर्श माता आहेत. देशातील कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, आज जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहोत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

Web Title: Companies moving out of the state is the triple engine failure of the government; Attack of Supriya Sule on BJP-Shivsena-NCP Govenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.