कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 07:31 PM2020-02-04T19:31:01+5:302020-02-04T19:48:57+5:30
बहुसंख्य कोण आहेत त्यावरून समाजाचे चारित्र्य घडते.
पुणे: कोणत्याही देशाची भावना ही तिथल्या बहुसंख्य समाजाची भावना काय आहे तीच असते. इथे हिंदू बहुसंख्य आहेत तर तीच इथली भावना आहे. कंपनीचे रजीस्टर असते तर देशाचे का नको? त्यामुळे एनआरसी, सीएए देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठीच आहे हे समजून घ्या असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मवती बनहट्टी प्रतिष्ठान यांनी बीएमसीसीच्या टाटा सभागृहात नागरिकत्व संशोधन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देवधर म्हणाले, काश्मिरमधून पंडिताना हाकलून दिले, त्यावेळी कोणाला काही म्हणावेसे वाटले नाही. या देशात किमान ५ कोटी घुसखोर आहेत, त्यातील दोन सव्वादोन लाख ख्रिश्चन आहेत, बाकी सगळे बांगला देशी घुसखोर आहेत. त्यांना हाकलून नाही लावायचे तर काय करायचे? एनआरसी व सीएए त्यासाठीच आहे. मात्र त्याबाबत अपप्रचार केला जात आहे.
कोणताही कंपनी किंवा अगदी उद्योग असला तर तिथे रजिस्टर असते. एखाद्या महाविद्यालयात ५ हजार विद्यार्थी आहेत व तिथे १०० जण जास्तीचे येऊन आम्हीही बसतो म्हणाले तर बसू दिले जाईल का? देश मग काय वेगळा आहे असा सवाल करून देवधर म्हणाले, देशातील नागरिकांचीही अशी नोंद हवी. हे आम्ही नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सांगितले. आम्ही ते करतो आहोत. काँग्रेसवाल्यांना इतक्या वर्षात जे जमले नाही ते नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी करून दाखवले. योगी आदित्यनाथ तेच करत आहेत. त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे.
हिंदू असाल तर ते अभिमानानेच सांगितले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी. त्यांनी सांगितले, मी हिंदू असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांना मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडून लगेच ऑफर आल्या. मात्र त्यांनी मी असे केले तर माझा बांधव या जमिनीपासून तुटेल असे सांगत त्या नाकारल्या व भारतीय भूमीतील बौद्ध धर्म स्विकारला. विवेकानंदानी जगाला सांगितले, होय, मी हिंदू आहे. आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात अडकले आहेत. काश्मिरी पंडिताना कोणी दया दाखवली नाही. आम्हीही ती आता कोणाला दाखवणार नाही.
प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले. शरद कुंटे,महेश आठवले, आदेश गोखले व्यासपीठावर उपस्थित होते.