मोदींची तुलना शिवरायांशी, भाजपच्या पुस्तकावर संताप; शिवप्रेमींकडून टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:00 AM2020-01-13T02:00:25+5:302020-01-13T02:00:44+5:30
तत्काळ बंदी घालण्याची मागणी
दिल्ली/मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मितेचा सर्वोच्च अभिमान बिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ नावाचे वादग्रस्त पुस्तक भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिले असून, या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन होताच, देशभरातील शिवप्रेमींंमध्ये संतापाची लाट उसळली. मराठा सेवा संघासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली असून, तत्काळ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील भाजपच्या प्रदेश मुख्यालयात धार्मिक संमेलन आयोजित केले होते. साधूसंतांना त्यात निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ््यातच गोयल यांच्या या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी यांच्या उपस्थितीत झाले. गोयल यांनी लिहिलेल्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्याने देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली.
भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांना हा प्रकार मान्य आहे का, असा थेट सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर अशा प्रकारचे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनांच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशारा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. तर अशा प्रकारच्या पुस्तकाचे प्रकाशन करणे हा तर शिवरायांच्या विचारांचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजीव सातव यांनीही या पुस्तकावरून भाजपवर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अशा महापुरुषाशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे भाजपने प्रकाशित केलेले ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक मागे घ्यावे. -छत्रपती संभाजी राजे भोसले, खासदार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याचा भाजप नेत्याचा प्रयत्न अत्यंत निंदाजनक आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: हा प्रकार नाकारावा. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. - कमलेश पाटील, महासचिव, मराठा सेवा संघ