लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 05:51 AM2024-11-23T05:51:35+5:302024-11-23T05:53:02+5:30
लोकसभेला २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिला मतदानाचे प्रमाण खूप वाढले. महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात महिलांना दिलेली ५० टक्के सवलत याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मात्र, हे सरकारविरोधी मतदान असल्याचा दावा मविआचे नेते करत आहेत.
मध्यप्रदेशमध्ये भाजपने लाडकी बहीण योजना आणली व नंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्ता आणण्यात या योजनेचा मोठा फायदा झाला होता.
लोकसभेला २ कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेला तब्बल ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१९ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ४३ लाख २५३ ने महिलांचे मतदान वाढले. त्यात तब्बल १६.३२ टक्क्यांची वाढ झाली. लोकसभेपेक्षा विधानसभेला पुरुष मतदार मात्र २७ लाख ८० हजार इतके वाढले. महिला मतदान वाढीत हिंगोली क्रमांक एकवर आहे. तेथे २६.८४% मतदान वाढले.
दिग्गजांचेही बदलू लागले दावे...
यावेळी अनेक मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती झालेल्या आहेत. आपण मोठ्या फरकाने जिंकणार असा दावा सुरुवातीला करणारे दिग्गजदेखील काही हजारांनी निवडून येऊ असे मतदानानंतर सांगू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर महिलांचे मोठे मतदान निर्णायक भूमिका बजावतील, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे.
महिलांचे मतदान वाढलेले जिल्हे असे - पुणे : ५,१८,६२८ ने वाढ. ठाणे : ३,२०,५१९ ने वाढ. नाशिक : २,६४,२७६ ने वाढ. नागपूर : २,३,०६१ ने वाढ. जळगाव : १,६८,३९७ ने वाढ, मुंबई उपनगरात १,७१,८७७ ने वाढ, अहिल्यानगरमध्ये २,२३,१८२ ने वाढ.
काय घडले कारण?
महायुतीतील तिन्ही पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. या योजनेंतर्गत महिलांना महिन्याकाठी १५०० रुपये दिले जातात.
चार महिन्यांचे पैसे निवडणूक आचारसंहिता लागू करण्यापूर्वीच लाखो महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.
आता ही रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीने ही रक्कम ३ हजार रुपये करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यांमधून दिले आहे.