शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

By admin | Published: August 4, 2016 02:38 AM2016-08-04T02:38:28+5:302016-08-04T02:38:28+5:30

अतिवृष्टिमुळे बाधित झालेल्या भातशेती, फळबाग व फुलबागाच्या सुमारे ४०० हेक्टर शेतीचेच तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी

Compensate the farmers | शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

Next


वसई : तालुक्यात गेल्या ८ दिवसात झालेल्या अतिवृष्टिमुळे बाधित झालेल्या भातशेती, फळबाग व फुलबागाच्या सुमारे ४०० हेक्टर शेतीचेच तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज वसईच्या तहसीलदारांकडे केली आहे.
वसई विरार जिल्हा काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष डॉमनिक डिमेलो यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन वसई तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी शासनाकडे करणारे एक निवेदन दिले.
यावेळी प्रदेश कॉँग्रेसचे सचिव विजय पाटील,वसई तालुका अध्यक्ष राम पाटील,सचिव किरण शिंदे, राजू गव्हाणकर,गीता र्वेर्णेकर, सीलु परेरा, निलेश पेंढारी,गणेश पाटील,नंदकुमार महाजन, रोहिणी कोचरेकर,लक्ष्मी मुदभटकल, श्रुती हटकर, प्रवीणा चौधरी, आसिफ शेख, दिलीप केवट,आशीष सुळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम विभागातील सुमारे ४०० हेक्टर शेती आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने वाया गेली असून पिके उध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे डॉमिनिक डिमेलो यांनी तहसीलदाराच्या निदर्शनास आणून दिले.यावर तहसीलदार पाटोळे यांनी नुकसानीचे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मार्फ़त तातडीने पंचनामे करण्यात येतील व कृषी विभागाला सुद्धा याबाबत आदेश देऊ असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
>यंदाही भातशेती खड्ड्यांत जाणार
विक्रमगड : यंदा शेतकऱ्यांनी विविध जातीचे बियाणे लावली आहेत. त्यातच उशिरा पाऊस सुरु झाल्यानंतर गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने व आता तर मुसळणार अतिवृष्टीने ठिकठिकाणची रोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाल्याने यंदाही भात उत्पादनात घट होणार आहे़. त्यामुळे तालुक्यातील विविध भागामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातलागवडीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करावे व त्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीही केली आहे़
>वाड्यात भातशेती पाण्याखाली
वाडा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली भाताची लागवड पाण्याखाली बुडाली असल्याने भातलागवड कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेते पाण्याने भरलेली असल्याने येथे भाताची लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही.
या ठिकाणी उशिरा लागवड झाल्यामुळे हे भातपीक रोगालाही बळी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगाई, आखाडी, या नद्या दुथडी भरून वाहत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तानसा व वैतरणा धरणेही भरून वाहण्याच्या स्थितीत असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन्ही नदीकाठच्या गावांतही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाने तालुक्यातील रस्तेही खराब झाले असून कोंढले, डोंगस्ते, देवघर मलवाडा, येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील डकिवली-केलठण रस्ता अतिवृष्टीने ठिकठिकाणी खचला आहे व खड्डे पडून या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून येथील ग्रामस्थांना वजे्रश्वरीहून १० किलो मीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Compensate the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.