पूरग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देणार
By admin | Published: September 24, 2016 02:57 AM2016-09-24T02:57:38+5:302016-09-24T02:57:38+5:30
फडणवीस यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पूर ग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळून देण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले.
डहाणू : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांच्या मालमत्तेची प्रशासनामार्फत पाहणी आणि पंचनामे झाल्यानंतर त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पूर ग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळून देण्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिले.
ते शुक्रवारी तारापूर, चिंचणी, वरोर, वाढवण, धाकटी डहाणू, बहाड या किनारपट्टी भागातील पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी आले होते. या वेळी त्यांच्या समवेत खासदार अॅड.चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भरत राजपूत, अशोक अंभीरे, विलास पाटील, विवेक कोरे, तहसीदार प्रीतीलता कौरथी माने, अशोक जोशी, विपुला सावे, मंजुषा चुरी, अब्दुल गफुर शेख हे होते. या वेळी त्यांनी चिंचणीच्या मुस्लीम मोहल्ला, वोशेरा तलाव, नागेश्वरी परिसर पाण्याखाली गेल्याने त्याला चिंचणी येथील मराठी शाळा नं. १ मध्ये हलविण्यात आले होते. तेथे जाऊन त्यांनी त्यांची विचार पूस केली. तेथून ते वरोर, बहाड, तडीयाळे, धाकटी डहाणू या रस्त्यावरील गावांची पाहणी केली. सेंटमेरीज हायस्कूलच्या पाठीमागे पाण्याखाली गेलेली वस्ती तसेच चंद्रिका हॉटेल, इराणी रोड रस्त्यावरील भागात पाहणी केली. (वार्ताहर)
>वाढवणकडे पाठ
या वेळी मंत्री विष्णू सावरा हे सर्वाधिक नुकसान झालेल्या आणि रस्ता वाहून गेलेल्या वाढवण टीघरेपाडा भागात मात्र फिरकलेच नाहीत. तारापूर खाडीत पुराच्या पाण्यात वाहून जावून मृत्यू झालेल्या चिंचणीच्या सोनू रामबहादूर यादव या तरुणाच्या घराकडे ही त्यांनी पाठ फिरवली.