रेशीम उद्योगातील शेतकर्यांना मिळणार नुकसान भरपाई
By admin | Published: June 16, 2014 10:00 PM2014-06-16T22:00:02+5:302014-06-16T22:12:41+5:30
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले.
अकोला : यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. विधान परिषदेचे आ. डॉ. रणजित पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि हवामानातील बदलामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. याचा फटका वाडेगाव परिसरासह बाळापूर आणि पातूर तालुक्यातील रेशीम प्रकल्पांनाही बसला होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्पांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात एकूण ७६ एकरावर तुती लागवड आहे; मात्र गारपिटीमुळे रेशीम प्रकल्पांचे नुकसान झाले असून, यामध्ये बीजकोश, अळ्यांसह पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. रेशमी उद्योगातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. डॉ. रणजित पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. यावर मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेमध्ये ओलितापेक्षा दीडपट जास्त आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन आ. डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.