सायन-पनवेल टोल कंपनीला नुकसानभरपाई
By admin | Published: July 14, 2015 01:27 AM2015-07-14T01:27:20+5:302015-07-14T01:27:20+5:30
छोट्या वाहनांना टोलमुक्ती दिल्याने सायन-पनवेल टोल कंपनीला होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाईल, असे राज्य
मुंबई : छोट्या वाहनांना टोलमुक्ती दिल्याने सायन-पनवेल टोल कंपनीला होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाईल, असे राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात शासनाने टोलमुक्ती जाहीर केली होती. याविरोधात कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली. कंपनीने सायन-पनवेल मार्गावर केलेल्या कामाचा अंदाज घेता येथील टोल नाक्यावर दरमहा ४५ लाख रुपये टोल जमा होणे अपेक्षित आहे. मात्र छोट्या वाहनांना टोल माफ केल्याने केवळ १० लाख रुपयेच टोल जमा होत आहे, असा दावा कंपनीने मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर केला.
कंपनीच्या नुकसानभरपाईसाठी गेल्या आठवड्यात बैठक घेण्यात आली होती. पण त्यात तोडगा निघाला नाही. त्यामुळे यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाईल, असे स्पष्ट करत शासनाने ही सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब करण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)