शिकवण्या लावण्यासाठी स्पर्धा

By admin | Published: June 25, 2014 01:25 AM2014-06-25T01:25:04+5:302014-06-25T01:25:04+5:30

स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक सातत्याने प्रयत्नरत असतात. मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला तरीदेखील अनेक

The competition for the tutorials | शिकवण्या लावण्यासाठी स्पर्धा

शिकवण्या लावण्यासाठी स्पर्धा

Next

पालकांची मानसिकता : मुलांच्या अभ्यासासाठी नाही वेळ
नागपूर : स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक सातत्याने प्रयत्नरत असतात. मुलांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला तरीदेखील अनेक पालक मुलांना खासगी शिकवणीत पाठवीत असल्याचे चित्र आहे. बऱ्याचशा पालकांना मुलांचा अभ्यास घ्यायलाच वेळ मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. विशेष म्हणजे नावाजलेल्या शिकवण्या लावण्यासाठी अक्षरश: स्पर्धा दिसून येत आहे.
मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे वाढते प्रमाण पालकवर्गात दिसत आहे. चांगली शाळा त्याचबरोबर चांगल्या शिकवणीची निवड करण्यातही पालकांची कसरत पाहायला मिळत आहे. शाळा सुरू होण्याअगोदरच खासगी शिकवण्यांसाठी पालकांची धावपळ सुरू होते. चांगली शाळा निवडण्याबरोबरच चांगली शिकवणी मिळविण्यासाठीही धडपड केली जाते. खासगी शिकवणींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे प्रमाण व त्याची कारणे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने सर्वेक्षण केले. यामध्ये विविध भागांतील व स्तरांतील पालकांची मते जाणून घेण्यात आली.
या सर्वेक्षणानुसार शहरातील जवळपास ७८ टक्के पालकांनी आपली मुले खासगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील खासगी शिकवणीचालकांना सध्या चांगलाच भाव मिळत असल्याचे दिसून येते.
मुलांना खासगी शिकवणी का लावली, या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ४२ टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर २१ टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही. मुलांचा घरी अभ्यास होत नाही, हेही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ६३ टक्के पालक मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे १४ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. हाही पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. काही पालकांनी शाळेव्यतिरिक्त मुलांचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी शिकवणी लावल्याचे स्पष्ट केले. तसेच, बदललेला अभ्यासक्रम कठीण असल्याने शिकवणीला टाकल्याचे पालकांनी मत व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रमात बरेचसे बदल झाल्याने त्या बदलत्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे कठीण असल्याने पालक मुलांसाठी शिकवणी हा पर्याय निवडताना आढळून आले. मुले आपले ऐकत नाहीत, असे सांगणारे पालकही या सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुढे आले आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The competition for the tutorials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.