आचारसंहितेपूर्वी कामे मंजुरीची स्पर्धा
By admin | Published: July 24, 2014 01:06 AM2014-07-24T01:06:21+5:302014-07-24T01:06:21+5:30
निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेपूर्वी विकास निधीतून (आमदार निधी) कामे मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत कामठीचे भाजपचे आमदार चंद्रशेखर
आमदार निधी: खर्चात बावनकुळेंची आघाडी
चंद्रशेखर बोबडे - नागपूर
निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेपूर्वी विकास निधीतून (आमदार निधी) कामे मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत कामठीचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे अव्वल ठरले आहेत. त्यांनी प्रस्तावित केलेल्या सर्व कामांच्या प्रस्तावांना नियोजन विभागाकडून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.
आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपये विकास निधी प्राप्त होतो. आमदारांनी प्रस्तावित केलेल्या कामांवर तो खर्च केला जातो. मिळणाऱ्या रक्कमेच्या दीडपट कामे प्रस्तावित करण्याचे अधिकार आमदारांना असतात. निर्धारित निधीपेक्षा जास्त निधीची कामांसाठी पुढच्या वर्षीच्या निधीतून रकमेची तरतूद केली जाते. शेवटच्या वर्षी मात्र ही सवलत दिली जात नाही.
नागपूर जिल्ह्यात एकूण १२ आमदार आहेत. त्यापैकी सहा शहरात आणि सहा ग्रामीणमध्ये असून प्रत्येकांने मागील चार वर्षातील त्यांच्या विकास निधीचा विनियोग केला आहे. यंदा प्रत्येकाला २ कोटी या प्रमाणे २४ कोटींच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६६ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. यातून गेल्या वर्षीच्या अतिरिक्त कामांसाठी निधी वळता करण्यात आला. उर्वरित रकमेतून करावयाच्या कामांसाठी सर्वच आमदारांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविले आहेत. प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी घेणे, निविदा काढणे आणि नंतर कामाला सुरुवात करणे ही नंतरची प्रक्रिया आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सरासरी एक महिन्याचा वेळ लागतो. मात्र यंदा निवडणुकीचे वर्ष असून १५ आॅगस्टपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच आमदार प्रयत्नशील आहेत. यात कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली आहे. २०१४-१५ या वर्षात दोन कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी ६९ लाखांचा निधी २०१३-१४ या वर्षाच्या कामांसाठी वळता करण्यात आल्यावर उर्वरित सर्व म्हणजे सरासरी १ कोटी ३१ लाखांच्या कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून निविदे प्रक्रियेपर्यंत त्यांचे काम आले आहे. आमदार देवेंद्र फडणवीस, विकास कुंभारे, सुधीर पारवे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्याही उर्वरित विकास निधीतील कामांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.
अ. आमदार शिल्लक निधी आलेले प्रस्ताव
१) चंद्रशेखर बावनकुळे १ कोटी ३१ लाख पूर्ण
२) अनिल देशमुख १ कोटी ४२ लाख पूर्ण
३) विजय घोडमारे १ कोटी ४२ लाख १ कोटी २७ लाख
४) सुधीर पारवे १ कोटी ५५ लाख पूर्ण
५) सुनील केदार १ कोटी ८० लाख १ कोटी २६ लाख
६) आशीष जयस्वाल १ कोटी ४० लाख १ कोटी २८ लाख
७) नितीन राऊत १ कोटी ४० लाख ५० लाख
८) कृष्णा खोपडे १ कोटी ६६ लाख १ कोटी ३ लाख
९) सुधाकर देशमुख १ कोटी ६८ लाख १ कोटी ४५ लाख
१०) दीनानाथ पडोळे १ कोटी ८० लाख १ कोटी ७५ लाख
११) देवेंद्र फडणवीस १ कोटी ६५ लाख १ कोटी ५५ लाख
१२) विकास कुंभारे १ कोटी ८० लाख १ कोटी ७० लाख