भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
By admin | Published: February 17, 2017 01:07 AM2017-02-17T01:07:42+5:302017-02-17T01:07:42+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जाहिरातींपोटी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जाहिरातींपोटी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक असताना भाजपाने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करून कायदाचा भंग केला आहे. या विरोधात आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. भाजपा पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
मुदतपूर्व निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तयार
शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा देणार नसून आम्ही मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी मुंबईत १७४ जागेवर निवडणूक लढवत आहे, ज्या ५३ ठिकाणी पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत, अशा जागी तेथील जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून भाजपा-सेना-मनसे-एमआयएम सोडून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.