केबल घोटाळ्याबाबत तक्रार दाखल
By admin | Published: June 5, 2017 03:02 AM2017-06-05T03:02:44+5:302017-06-05T03:02:44+5:30
केबलचालकांच्या विरोधात आयकर विभागाकडे ३०० पानांच्या भरभक्कम पुराव्यासह तक्रार दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जनतेकडून विनापावती रक्कम घेऊन कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणाऱ्या येथील केबलचालकांच्या विरोधात आयकर विभागाकडे ३०० पानांच्या भरभक्कम पुराव्यासह तक्रार दाखल झाली आहे. विनापावती रक्कम वसुलीची चौकशी करण्यासाठी वैधमापन विभागानेही विशेष मोहीम उघडली आहे.
या केबल घोटाळ्याची चौकशी जिल्हा प्रशासनामार्फत आधीच सुरू आहे. आता आयकर विभागाकडेही
तक्रार दाखल झाल्याने या केबल घोटाळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले झाले आहे. केबल चालकांनी करमणूक विभागाकडून परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच अलिबागच्या तहसीलदारांना नोटीस बजावली होती. या तफावतीबाबत त्यांचे स्पष्टीकरणही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविले आहे.
अलिबाग येथील केबलचालक ग्राहकांना गेली १० वर्षे कोणत्याही प्रकारची पावती न देता, ग्राहकांकडून विनापावती फी व विक्र ीकर वसूल करीत असल्याचे तहसीलदार अलिबाग यांच्या अहवालावरून सिद्ध झाले आहे. ते वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आयकर, विक्र ीकर विभागाचे कर बुडवून कमवित असल्याने त्यांच्या अवैध उत्पनाची चौकशी होण्याबाबत तीनशे पानांच्या भरभक्कम पुराव्यांसह आयकर विभागाकडे आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी तक्र ार दाखल केली आहे. या तक्र ारीमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे येथील केबलचालकाने आता केबल व्यवसाय हा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी त्यांच्या पत्नीने अलिबाग नगरपरिषदेची २०१६ची सार्वत्रिक निवडणूक लढविली आहे. त्या नगरसेविका म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्यांनी त्या वेळी निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर करताना या केबल व्यवसायाविषयी काहीही नमूद केलेले नसल्याचे सावंत यांनी
तक्र ारीत म्हटले आहे. तसेच याच प्रतिज्ञापत्रात त्यांनी आयकर भरत नसल्याचे त्यांनी लिहून दिले आहे. त्यांनी त्यांच्या पतीचे व त्यांचे स्वत:चे पॅन कार्ड नंबरही नमूद केलेले नाहीत. आयकर विवरण व पॅन कार्ड नंबर दर्शवित नसल्याने त्यांची व त्यांच्याशी संबंधित सर्वांची करचुकवेगिरी उघड होते, असे सावंत यांनी सांगितले.