आॅनलाइन सॉफ्टवेअर चोरल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:00 AM2018-06-28T06:00:15+5:302018-06-28T06:00:17+5:30
नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आॅनलाइन सॉफ्टवेअरच्या विरोधात एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मुंबई : नुकत्याच लोकार्पण करण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आॅनलाइन सॉफ्टवेअरच्या विरोधात एफडीएच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या आॅनलाइन सॉफ्टवेअरमध्ये वापरण्यात आलेली माहिती आपल्याकडून चोरल्याचा आरोप ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला आवश्यक असलेले आॅनलाइन सॉफ्टवेअर आपणच तयार केल्याचा सूर्यवंशी यांचा दावा आहे.
संबंधित सॉफ्टवेअर तयार करून, त्याचे सादरीकरण एफडीएच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुल येथील कार्यालयात करण्यात आले होते. मात्र, या सॉफ्टवेअरची सर्व माहिती संबंधित अधिकाºयांनी एका संस्थेला पुरविली, संस्थेच्या आपल्या सॉफ्टवेअरची गरज नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी नवे आॅनलाइन सॉफ्टवेअरचे लोकार्पण केले. या सॉफ्टवेअरमधील बहुतेक डाटा हा आपल्याच सादरीकरणातून चोरल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे. या सॉफ्टवेअरसाठी झालेल्या लाखो रुपयांच्या व्यवहाराचीही चौकशी करण्याचे आवाहन त्यांनी तक्रारीत केले आहे.