आमीर खानविरुद्ध काँग्रेसचीही तक्रार
By admin | Published: February 23, 2017 04:49 AM2017-02-23T04:49:26+5:302017-02-23T04:49:26+5:30
राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी
मुंबई : राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदारांना प्रभावित करणारी व भाजपाचा अजेंडा पुढे नेणारी जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याबद्दल, अभिनेता आमीर खान, भारतीय जनता पक्ष आणि मुंबई फस्ट या एनजीओच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रारवजा मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना भेटून सावंत यांनी तक्रार दिली. मुंबई फस्ट ही एनजीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वॉररूम’साठी काम करत आहे, असे या एनजीओच्या वेबसाइटवरच म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी ‘पारदर्शकता व परिवर्तन’ हा शब्द सगळीकडे प्रचारात वापरला होता. सदर जाहिरातीतदेखील पारदर्शकता व परिवर्तन या शब्दाचा वापर केला गेला, असेही सावंत यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ४८ तास आधी राजकीय पक्षांच्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातून प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली होती.
मात्र, मुंबई फर्स्ट या संस्थेने निवडणूक आयोगाचा आदेश डावलून भाजपाला मदत करण्यासाठी ‘पारदर्शकता’ आणि ‘परिवर्तन’ या मुद्द्यांवर मतदान करा, अशा जाहिराती मराठी हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात छापल्या. जाहिरात बंदीच्या निर्णयातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न भाजपाने या जाहिरातींद्वारे केला असून, कायद्यातून पळवाट शोधणे ही गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती भाजपाची असल्याची टीका सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)