भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By admin | Published: April 20, 2017 07:07 AM2017-04-20T07:07:01+5:302017-04-20T07:07:01+5:30
स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून महापालिकेत भाजपा कार्यकर्त्यांनी राडा केला. यामध्ये भाजपाचे सरचिटणीस गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भा..
पुणे : स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून महापालिकेत भाजपा कार्यकर्त्यांनी राडा केला. यामध्ये भाजपाचे सरचिटणीस गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालय व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली. या तोडफोड प्रकरणात घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात शिवाजीनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या सुरक्षा विभागातील सुरक्षारक्षकांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकपदाच्या जागांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. भाजपाकडून गोपाल चिंतल, रघुनाथ गौडा आणि गणेश घोष यांच्या नावाची दुपारी घोषणा करण्यात आली होती. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात हे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी गणेश घोष यांच्याऐवजी गणेश बिडकर यांचा उमेदवारी अर्ज भरा, असा निरोप श्रीनाथ भिमाले
यांना दिला.
याबाबत प्रशासनाकडून पोलिसांना बोलविण्यात आले. पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला. त्याचवेळी प्रभारी आयुक्तांच्या आदेशावरून सुरक्षा विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करत अहवाल तयार केला. याप्रसंगी महापौर कार्यालय परिसरात ड्युटीवर असलेले सुरक्षा विभागाचे जमादार कादबाने आणि कर्मचारी बागुल यांनी शिवाजीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
त्यानंतर दुपारी महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)