दोन संचालकांच्या विरोधात सभासदत्व रद्दसाठी तक्रार
By admin | Published: August 3, 2016 12:59 AM2016-08-03T00:59:12+5:302016-08-03T00:59:12+5:30
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्ष आता विकोपाला गेला आहे.
बारामती/माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्तासंघर्ष आता विकोपाला गेला आहे. कारखान्याच्या एका सभासदाने दोन संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. अनामत रकमेपोटी घेतलेली उचल ३० दिवसांच्या आत भरणे आवश्यक असताना त्याची पूर्तता केली नाही; त्यामुळे सहकारी संस्था कायद्यानुसार उज्ज्वला हर्षल कोकरे, दत्तात्रय गणपत गवारे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. यावर १० आॅगस्ट रोजी सुनावणी होईल.
याबाबतचे पत्र संबंधित संचालक, माळेगाव कारखाना तसेच तक्रारदार यांना प्रादेशिक सहसंचालकांनी पाठविले आहे. संचालक अपात्र ठरल्यास कारखान्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष काही प्रमाणात कमी होईल. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात कारखान्याचे सभासद रामचंद्र विठ्ठल टेकवडे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांनी तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रार अर्जात संचालिका उज्ज्वला हर्षल कोकरे २ लाख आणि दत्तात्रय गणपत गवारे यांनी १ लाख रुपये एप्रिल २०१६मध्ये अनामत रकमेपोटी उचल घेतली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७३ क, अ व नियम ५८ नुसार ही रक्कम ३० दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. मात्र, या संचालकांनी त्याची पूर्तता न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, अशी तक्रार केली आहे.
यापूर्वी ८ संचालकांनी बंडखोरी केली होती; मात्र मध्यंतरीच्या तडजोडीनंतर ५ जणांचे बंड कायम राहिले. इतरांनी सत्ताधारी गटाशी जुळवून घेतले. या ५ बंडखोर संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली तेव्हापासून राजकारण फिरले. राष्ट्रवादीचे ६ आणि बंडखोरी केलेले ५ संचालक म्हणून ११ जणांनी कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत बैठक बोलवावी, अशी मागणी प्रादेशिक सहसंचालकांकडे केली होती.
मात्र, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, सहकारी संस्था १९६१ तसेच कारखान्याच्या नोंदणीकृत उपविधीच्या अनुषंगाने तसे निर्देश देता येत नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर कोकरे आणि गवारे या दोन संचालकांच्या उचलीसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
>माळेगाव सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा अधिक २,८०० रुपये दर दिला आहे. तो राज्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पुढील हंगामाची तयारीदेखील सध्या सुरू असताना सत्तासंघर्ष विकोपाला गेला आहे. त्यातच संचालकांच्या उचलीसंदर्भात तक्रार दाखल झाल्याने आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सभासदांना लागली आहे. कारखान्यात यापूर्वीदेखील १९९७मध्ये सत्तांतर झाले होते. त्यानंतर पुन्हा चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी एकत्र येऊन दीड वर्षापूर्वी अजित पवार यांच्या पॅनलचा पराभव करून सत्ता मिळविली.