सलमान खानच्या विरोधात तक्रार दाखल

By admin | Published: June 21, 2016 09:38 PM2016-06-21T21:38:15+5:302016-06-21T21:38:15+5:30

आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत राष्ट्रवादीच्या तक्रारीमुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Complaint against Salman Khan | सलमान खानच्या विरोधात तक्रार दाखल

सलमान खानच्या विरोधात तक्रार दाखल

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत राष्ट्रवादीच्या तक्रारीमुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य सलमानने केल्यामुळे मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी   महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या वतीने सीताबर्डी पोलिसांकडे निवेदनवजा तक्रार अर्ज देऊन सलमानविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शूटिंगमुळे आलेल्या थकव्याने बलात्कार झालेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केले. त्यामुळे सर्वत्र वादळ उठले आहे. सलमानच्या या वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले असून, मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ आणि स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात पन्नासावर महिलांनी झाशी राणी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. तेथे रेवतकर यांनी सलमानविरुद्ध निवेदन दिले. सलमानच्या वक्तव्यामुळे सर्वच समाजातील महिलांचा अपमाण झाला असून, त्याच्या या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिलांसाठी लज्जास्पद ठरणारे हे वक्तव्य करणा-या सलमान खानविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या या पवित्र्यामुळे सलमानविरुद्ध गुन्हा दाखल होणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याअनुषंगाने सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. निवेदनात सलमानने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, ते स्पष्ट नाही. त्यामुळे चौकशी करूनच पुढे काय ते ठरवू, असे बंडीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Complaint against Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.