संजय दत्तविरुद्धची तक्रार निराधार
By admin | Published: May 17, 2015 01:55 AM2015-05-17T01:55:12+5:302015-05-17T01:55:12+5:30
येरवडा तुरुंगात अभिनेता संजय दत्तसह काही मोजक्या लोकांना ‘विशेष सवलती’ दिल्या जात असल्याच्या कैद्यांच्या तक्रारी निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डिप्पी वांकाणी - मुंबई
येरवडा तुरुंगात अभिनेता संजय दत्तसह काही मोजक्या लोकांना ‘विशेष सवलती’ दिल्या जात असल्याच्या कैद्यांच्या तक्रारी निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा तक्रारींची या आठवड्यात वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे.
या प्रकरणात एकदम काही कारवाई करू नये अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका होती. परिणामी, त्यांनी दत्तचे म्हणणेही नोंदवून घेतले. दत्तने सांगितले की, मी तुरुंगाच्या नियमांचे पालन करीत असून कागदाच्या पिशव्या बनविण्याचे काम करीत आहे. फावल्या वेळात हिंदी चित्रपटासाठी पटकथा लेखन करीत आहे. पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) बी.के. सिंह यांनी सांगितले की, ‘संजय दत्तला अन्य ७-८ कैद्यांसह कोठडीत ठेवण्यात आले आहे. मी त्याची भेट घेऊन त्याचे म्हणणे नोंदवून घेतले. दत्त म्हणाला की, तो तुरुंगात कागदाच्या पिशव्या तयार करण्याच्या विभागात काम करतो आहे. पटकथा लिखाणासह ग्रंथालयात काही पुस्तके वाचत आहे. सिंह म्हणाले, ‘‘ज्या तक्रारी आणि आरोप करण्यात आले होते ते चौकशीत सिद्ध झाले नाहीत. काही कैद्यांना खास सवलती दिल्या गेल्याची सामान्य तक्रार होती परंतु त्यात सत्यता नव्हती.’’ संजय दत्तबद्दल विचारले असता सिंह म्हणाले, त्याला इतर कैद्यांप्रमाणेच तुरुंगाचे अन्न देण्यात आले. त्याला काम करणे सक्तीचे आहे. अजूनपर्यंत त्याने काही खास सवलतींची मागणी केलेली नाही, असेही सिंह म्हणाले.