शिवसेनेची भाजपाविरोधात तक्रार
By admin | Published: February 11, 2017 04:56 AM2017-02-11T04:56:02+5:302017-02-11T04:56:02+5:30
पालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शिवसेना, भाजपातील कलगीतुराही रंगू लागला आहे
मुंबई : पालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शिवसेना, भाजपातील कलगीतुराही रंगू लागला आहे. भाजपाने जाहिरातींच्या होर्डिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचा वापर केल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला असून तशी लेखी तक्रारच निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भाजपा विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरू नयेत, असा नियम आहे. तरीही भाजपाने शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांच्याकडे केली आहे. यापुर्वी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठे राजकारण पाहायला मिळाले होते. आता राष्ट्रपुरूषांचे छायाचित्र वापरण्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.