राज्य माहिती आयोगाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:18 PM2020-12-22T12:18:22+5:302020-12-22T12:20:48+5:30
State Information Commission ऑनलाइन तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात येणार आहे
- संतोष येलकर
अकोला : माहिती अधिकारात अर्ज दाखल करणाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी लावण्यात आली आहे. माहिती अधिकारातील अर्जांसंदर्भात ऑनलाइन तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात येणार आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या विभागांत अर्ज सादर करण्यात येतात. परंतु माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी केलेला अर्ज संबंधित विभागांत स्वीकारण्यात येत नाही, अर्ज स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही, दाखल केलेल्या अर्जाची अनेकदा दखल घेण्यात येत नाही, अर्ज केल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते त्यामुळे संबंधित विषयाची माहिती मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी अर्जदारांकडून होत असतात. त्यामुळे माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी अर्जदारांना त्रास होऊ नये, तातडीने माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना त्रास होऊ नये, यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर १० डिसेंबरपासून तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवर तक्रारपेटीद्वारे ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
ही माहिती नमूद करणे आवश्यक !
माहिती अधिकारात माहिती मिळण्यास त्रास होत असलेल्या अर्जदारांना राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवरील तक्रारपेटीमध्ये अर्जदारांना मोबाइल क्रमांक, तक्रार असलेल्या संबंधित अधिकाऱ्याचे पद नमूद करणे आवश्यक आहे.
माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी अर्जदारांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवर तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवरील तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
-संभाजी सरकुंडे, राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ