त्र्यंबकेश्वरमध्ये गुन्हा दाखल
By admin | Published: April 16, 2016 02:17 AM2016-04-16T02:17:00+5:302016-04-16T02:17:00+5:30
मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली धक्काबुकी आणि मारहाणप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला
त्र्यंबकेश्वर / कोल्हापूर : मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली धक्काबुकी आणि मारहाणप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, तर कोल्हापुरात आज शनिवारी गुन्हा दाखल होणार आहे.
स्वराज्य महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सुमारे २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सहकारी महिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करीत होतो. यावेळी पुजारी, पुरोहित, नगरसेवक, ग्रामस्थ, विश्वस्त, महिला-पुरुष आदींनी गर्भगृहात जाऊ न देता मारहाण केली. तुम्ही ‘ड्रेसकोड फॉलो’ करून या, तुम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळेल, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही सुती साड्या परिधान करून गेलो. यावेळेस तुमच्या अंगावर ओले कपडे नाही आदी कारणे दाखवून प्रवेश न देता मारहाण करीत मंदिराबाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तथापि विरोध करणाऱ्यांचे नाव, गाव माहीत नसल्याचे म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे नियमांचा भंग करीत मंदिरात शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आला.
कोल्हापुरात आज गुन्हा दाखल होणार
श्री अंबाबाई देवी मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आज, शनिवारी दुपारपर्यंत अहवाल सादर करतील. त्यानंतर रात्री उशिरा नावे निष्पन्न झालेल्या दोषींवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी मंदिरातील मारहाण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पोलीस अधीक्षक देशपांडे यांनी तातडीची बैठक घेतली.
घटना घडली त्या दिवशी अपर पोलीस अधीक्षक डॉ. बारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास योग्यरीत्या व अभ्यासपूर्ण होईल, असे सुचवत त्यांच्याकडे तपास सोपविण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तृप्ती देसाई यांना पोलीस संरक्षण दिल्याने पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ ‘कोल्हापूर बंद’चा इशारा अंबाबाई शांतता समितीने दिला आहे.