पालकमंत्र्यांविरोधात तक्रारी!
By Admin | Published: February 23, 2015 11:45 PM2015-02-23T23:45:08+5:302015-02-23T23:56:04+5:30
मनमानीपणाचाही आरोप : शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकारी आक्रमक
सातारा : ‘शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री मानसन्मान देत नाहीत, कधी भेटीस वेळ देत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्याचीही माहिती दिली जात नाही, अशा शब्दांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याविरोधात विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत तक्रारींचा पाढाच वाचला. दुपारी एकला सुरू झालेली ही बैठक तब्बल पाच तास चालली.दरम्यान, पालकमंत्री साताऱ्यात असूनही त्यांच्या दौऱ्याकडे या बैठकीच्या निमित्ताने एकप्रकारे अनेक शिवसैनिकांनी पाठच फिरविल्याचे दिसून आले.येथील विश्रामगृहावर शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, हर्षल कदम, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, हणमंत चवरे, चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. बैठकीत नरेंद्र पाटील यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. ते म्हणाले, ‘सातारचे पालकमंत्री म्हणून विजय शिवतारे यांची नियुक्ती झाली आहे; पण त्यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नाही. दौऱ्याची माहिती दिली जात नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छोट्या गोष्टींसाठी लाचारी पत्करू नये. शिवसेना या चार शब्दांना असणारी किंमत आपल्या वृत्तीमुळे कमी होईल, असे वागू नये.’ दरम्यान, या बैठकीसंबंधी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘ही बैठक नेहमीप्रमाणे संघटनात्मक बाबी आणि आगामी सहकारातील निवडणुका यावर होती. यामध्ये अन्य विषय चर्चीले नाहीत. (प्रतिनिधी)
शिवसेनेची बैठक माझ्याच नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यामध्ये कोणताही वाद झालेला नाही. पालकमंत्र्यांनी कोणाचेही काम थांबविलेले नाही. आजच्या बैठकीत पक्षसंघटनेवर चर्चा झाली.
- प्रा. नितीन बानुगडे-पाटील,
शिवसेनेचे उपनेते