कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये झाली घट

By Admin | Published: May 14, 2017 05:00 AM2017-05-14T05:00:14+5:302017-05-14T05:00:14+5:30

स्वसुरक्षेसाठी महिलांनी स्वत:च स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत, रात्री-बेरात्री एकटीने बाहेर फिरू नये

Complaints of Family Violence | कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये झाली घट

कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये झाली घट

googlenewsNext

ऋचिका पालोदकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वसुरक्षेसाठी महिलांनी स्वत:च स्वत:वर काही बंधने घालून घ्यावीत, रात्री-बेरात्री एकटीने बाहेर फिरू नये असे मुलींना, महिलांना कायमच सांगण्यात येते; पण ही सर्व बंधने पाळून सायंकाळी सातच्या आत घरात आलेली महिला आपल्या कुटुंबात तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती अजूनही अनेक घरांमध्ये दिसून येते. महिला आपल्याच कुटुंबात कितपत सुरक्षित आहे, याबाबत जागतिक कुटुंब दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निदर्शनास आलेली सुखद बाब अशी की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये किंचित का होईना परंतु घट झालेली आहे.
१५ मे हा दिवस सर्वत्र ‘कुटुंब दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांविषयी जाणून घेण्यासाठी शहरातील
महिला साहाय्य कक्षाला भेट दिली असता, असे निदर्शनास आले की, कलम ४९८ अंतर्गत २०१६ या वर्षीच्या तुलनेत २०१७मध्ये नोंदविल्या गेलेल्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. २०१६ या वर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण ४३९ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या वर्षी एप्रिलअखेरीस ही संख्या ४१९ आहे. अर्थातच हे प्रमाण कमी असले तरी फारसे समाधानकारक निश्चितच नाही.
सासू-सुनेचे वाद, नणंद- जावांकडून छळ, घरातील एखाद्या पुरुषाची वाईट नजर, नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा, कुटुंबीयांनी मर्जीविरुद्ध लग्न लावून दिल्यामुळे विवाहितेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी, वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी वाद अशा अनेक तक्रारी घेऊन अनेक महिला या कक्षाकडे मदतीसाठी येतात. तक्रारकर्त्या महिलांमध्ये गृहिणी, कमी शिकलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे, हेही विशेष.
कुटुंबात एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे महिला साहाय्य कक्षाकडे येणाऱ्या तक्रारी वाढल्या आहेत असे वाटते. कुटुंबीयांनी येणाऱ्या सुनेला समजून घेतले आणि नव्या सुनेने जर थोडी सहनशीलता ठेवली तर अनेक प्रश्न सुटतील आणि ‘कुटुंब’व्यवस्था टिकून राहील; पण त्याचबरोबर एखाद्या महिलेवर खरोखर अत्याचार होत असेल, तर हा अन्याय सहन न क रता तिने नक्कीच कायद्यांचा आधार घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे.
- किरण पाटील, पोलीस निरीक्षक,
महिला साहाय्य कक्ष

Web Title: Complaints of Family Violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.