मंत्रिमंडळावर तक्रारींचा पाऊस !

By admin | Published: March 5, 2016 04:25 AM2016-03-05T04:25:59+5:302016-03-05T04:25:59+5:30

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जागोजागी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला

Complaints of rain on the Cabinet! | मंत्रिमंडळावर तक्रारींचा पाऊस !

मंत्रिमंडळावर तक्रारींचा पाऊस !

Next

लातूर/ बीड/ उस्मानाबाद : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जागोजागी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवरचा संताप शासनकर्त्यांवर व्यक्त केला. दरम्यान, मी काही द्यायला आलो नाही तर सरकारने ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, हे पाहायला आलो आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी शुक्रवारी लातूर जिल्हा पालथा घालून दुष्काळ पाहणी केली. चाकुरात कृषी विभागाने चाऱ्याची चुकीची आकडेवारी दाखविल्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले, तर गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासमोरही पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचे प्रमाण कमी दाखविल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील दुष्काळी पाहणीचा दौरा केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिरुर अनंतपाळ तालुका दत्तक घेतला असल्याचे जाहीर केले. औसा तालुक्यातील उजनी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संजय व्यंकटराव जाधव यांच्या कुटुंबीयांची पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट घेत त्यांची संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचे सांगून २ लाखांची मदत रोख स्वरूपात दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर शेतकऱ्यांनी कैैफियत मांडली. रोहयोतून विहिरीचे काम केले. अनेकदा चकरा मारूनही बिल मिळत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. लोहारा येथे हाताला काम मिळत नसल्याची तक्रार मजुरांनी केली असता राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना आपण जनतेचे सेवक आहोत; मालक नाहीत, अशा शब्दांत खडसावले. असाच प्रकार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोरही घडला. येडशी येथे पाहणीसाठी गेल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी गावात दोन-तीन टँकर मंजूर आहेत. मात्र, एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. एका टँकरचे पाणी गावाला कसे पुरेल, असा सवालही त्यांनी केला.
बीड जिल्ह्यात ११ तालुक्यांसाठी ११ मंत्र्यांचे दौरे निश्तिच होते. जागोजागी शेतकरी मंत्र्यांपुढे गाऱ्हाणी मांडण्यासाठी सकाळी सात वाजेपासूनच बसलेले होते. मात्र, मंत्र्यांनी तलाव, नाला-बांधबंधिस्ती, आटलेली धरणे, मग्रारोहयोची कामे अशी मोजक्याच बाबी पाहिल्या अन् जिल्हा सोडला. बहुतांश मंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे टाळले.
—-
लोणीकर आजारी
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे आजारी आहेत. वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यामुळे ते दुष्काळी दौऱ्यासाठी येऊ शकले नसल्याने त्यांचा माजलगाव तालुक्यात नियोजित दौरा ऐन वेळी रद्द झाला.
——
जळकोटमध्ये कार्यकर्त्यांत झटापट !
जळकोट दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काँग्रस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विलासराव देशमुख यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झटापट झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
- अन् आजीबार्इंनी काढली मुख्यमंत्र्यांची नजर
दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची लांबोटा येथील ७० वर्षीय विमल संतराम जाधव या आजीबाईने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्या नातवाचे उपचार झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांची नजर उतरविली.

- मंत्री तावडेंवर फेकली दुधाची पिशवी !
उस्मानाबादेत शिक्षणमंत्री तावडे यांना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून सलामी दिली. तर, येडशी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या दिशेने दुधाची पिशवी फेकली. यावेळी तावडे यांच्या स्वीय सहाय्यकासह पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली.
तावडे यांचा ताफा येडशीला रवाना झाला. तेथील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधून तावडे बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी तावडे यांच्या दिशेने दुधाची पिशवी फेकली. पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले. पण तावडे यांचे स्वीयसहाय्यक संतोष सुर्वे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्षच इंगळे यांना बेदम मारहाण केली. यात इंगळे यांच्या डोक्याला इजा झाली असून, त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
——-
मी शाळेच्या आवारात मुलांसोबत असताना काचेची बाटली माझ्यावर फेकण्याचा काय उद्देश होता? मराठा आरक्षणासाठी लढणारा मंत्री म्हणून माझ्यावर राग आहे का, याचे उत्तर त्यांनी द्यावे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Web Title: Complaints of rain on the Cabinet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.