तक्रार मागे घेण्यासाठी दिला जात होता त्रास
By admin | Published: July 15, 2016 06:20 PM2016-07-15T18:20:16+5:302016-07-15T18:20:16+5:30
विनयभंगाची तक्रार दिल्यापासूनच आपल्यावर पाळत ठेवली जात होती.
ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव, दि. 15 - विनयभंगाची तक्रार दिल्यापासूनच आपल्यावर पाळत ठेवली जात होती. गुन्हा मागे घ्यावा यासाठी दबाव आणला जात होता अशी प्रतिक्रिया अत्यवस्थ डॉ.मनीषा महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या त्रासास कंटाळून त्यांनी १४ रोजी दुपारी फिनाईल हे विषारी द्रव सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सुनील माळी यांच्या विरोधात त्यांनी मुंबई येथे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आरोग्य केंद्राच्या कामानिमित्त त्या मुंबईस गेल्या असताना हा प्रकार घडला होता. माळी हे असभ्य बोलल्या बद्दलची तक्रार त्यांनी मुख्यामंत्र्यांकडेही केली होती.
सुनील माळी व त्या एकाच समाजाच्या आहे. यामुळेच व्हाट्सअप व सोशल मिडियावर तक्रारीनंतर त्यांची बदनामी करण्यात आली. खासगी आयुष्यात दखल दिली जात होती. तसेच गुन्हा का दाखल केला? तो मागे घ्यावा यासाठीही दबाव आणला जात होता. यामुळेच तणाव वाढल्याने आपण विषारी द्रव सेवक केले असेही डॉ.महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, १५ रोजी डॉ.महाजन यांचा पोलिसांनीही जबाब घेतला. राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, आमदार उन्मेष पाटील यांनी डॉ.जयवंत देवरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ.महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन विचारपूसही केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असनू त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.