मराठा आरक्षण माहिती संकलनाचे ६०% काम पूर्ण, मागासवर्गीय आयोगाकडून वेळापत्रक तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:07 AM2018-08-14T05:07:47+5:302018-08-14T05:08:08+5:30
मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे.
पुणे - मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. माहिती संकलनाचे सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाले असून पुढील चार ते पाच दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल तीन महिन्यांत तयार केला जाणार आहे. त्यासाठीच्या विविध टप्प्यांचे वेळापत्रक आयोगाने तयार केले आहे. त्यानुसार बार्टीमध्ये आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन करण्यात आले. तसेच माहिती संकलनाची कार्यपद्धती निश्चित करून त्या दृष्टीने ‘डेटा एंट्री’ केली जात आहे. आयोगाचे सदस्य स्वत: उपस्थित राहून अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती योग्य प्रकारे संकलित करत आहेत.
आरक्षणासंदर्भातील अहवालाचे अंतिम लिखान करण्यापूर्वी संबंधित माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलित केली जात आहे. सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ न मिळणाºया घटकांमधील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तफावत आयोगाकडून तपासली जात आहे. पुढील चार ते पाच दिवसांत अहवालासाठी अपेक्षित ‘डेटा एंट्री’ पूर्ण होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
आणखी दोन आत्महत्या
बीड/औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठवाड्यात बीड व आणखी दोघांनी आत्महत्या केल्या. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील राहुल पद्माकर हावळे (२०) याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील ही सातवी आत्महत्या आहे. तर औरंगाबादला केशव साहेबराव चौधरी (५५) यांनी सोमवारी दुपारी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये मदत व कुटुंबातील सदस्यास पात्रतेनुसार नोकरी देण्यात येईल, असे पत्र उपविभागीय अधिकाºयांनी कुटुंबियांना दिले.