राज्यात ‘आधार’ची ९४ टक्के नोंदणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:45 AM2019-07-09T06:45:59+5:302019-07-09T06:46:02+5:30
पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या नोंदणीकडे अधिक लक्ष : अंगणवाडी सेविकांची प्रशासन घेणार मदत
- खलील गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांची ९४ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली असून, नवजात बालक ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने, हे प्रमाण वाढविण्याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेतला असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या नोंदणीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९४ टक्के नागरिकांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींचे प्रमाण १०७ टक्के, ५ ते १८ वयोगटांतील व्यक्तींचे प्रमाण ८० टक्के तर शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २४ टक्के जणांचीच आधार नोंदणी करण्यात आली आहे. हे प्रमाण अत्यंत कमी असल्याने या वयोगटातील आधार नोंदणी वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येच्या ९७ टक्के नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ३६ टक्के आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नोंदणीचे प्रमाण १०० टक्के आहे, तर ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ८५ टक्के आहे. गोव्यामध्ये शंभर टक्के नागरिकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. गोव्यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या नोंदणीचे प्रमाण ४८ टक्के आहे. ५ ते १८ वयोगटांतील नागरिकांच्या नोंदणीचे प्रमाण ९२ टक्के आहे. आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही. मात्र, आधार नोंदणी अत्यावश्यक असल्याने आधार नोंदणीवर भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात दररोज सुमारे ३८ हजार आधार नोंदणी केली जाते. आधार नोंदणीला मोबाइल क्रमांक जोडण्याचे प्रमाण ५५ टक्के आहे.
शून्य ते ५ वयोगटातील केवळ २६ टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण
१३५ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी १२३ कोटी ६० लाख भारतीयांची नोंदणी करण्यात आली आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ८८.७ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
ं५ ते १८ वयोगटांतील ७५.४ टक्के नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
शून्य ते ५ वयोगटांतील केवळ २६
टक्के जणांचीच नोंदणी पूर्ण