‘कॅशलेसचे आश्वासन पूर्ण करा’
By admin | Published: May 2, 2016 01:00 AM2016-05-02T01:00:56+5:302016-05-02T01:00:56+5:30
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षकांना कॅशलेस विमा देण्याची घोषणा केली
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षकांना कॅशलेस विमा देण्याची घोषणा केली
होती. मात्र अद्याप ही घोषणा हवेतच असल्याने त्याची तत्काळ पूर्तता करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे.
शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करून त्याचे पालन केले नसल्याने शिक्षकांची निराशा झाली असल्याचे मत शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी व्यक्त केले. सुळे म्हणाले की, कॅशलेस योजनेवर साधी चर्चा करण्याचे औदार्यही तावडे यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे तत्काळ शिक्षकांसाठी कॅशलेस विमा योजना लागू करून शिक्षकांसह शिक्षक कुटुंबाना दिलासा द्यावा. तरी कामगार नेते व आमदार भाई जगताप शिक्षक सेलच्या या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, म्हणून मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी राज्यातील शिक्षकांची २ लाखांपर्यंतची मेडिकल बिले मंजूर करण्याचा अधिकार जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना आणि २ लाखांहून अधिक रुपयांची मेडिकल बिले मंजूर करण्याचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्याची मागणी शिक्षक सेलने दोनवेळा प्रशासनाकडे केली होती. ती मान्य करत तसे परिपत्रक शासनाने काढल्याचा दावा सुळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)