नागरी कामे त्वरित पूर्ण करा; स्थापत्य समिती अध्यक्षांचे निर्देश
By Admin | Published: April 25, 2016 05:49 AM2016-04-25T05:49:56+5:302016-04-25T05:49:56+5:30
महापालिकेच्या स्थापत्य समिती उपनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ विविध विकासकामांचा आढावा घेतला.
मुंबई : महापालिकेच्या स्थापत्य समिती उपनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ विविध विकासकामांचा आढावा घेतला. शिवाय या संदर्भात एक आढावा बैठकही त्यांच्या दालनात घेतली. या वेळी त्यांनी प्रलंबित नागरी कामे लवकारात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
के (पूर्व) विभागातील उद्यानांचा विकास, साफसफाई यंत्रणा व मुंबई वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानात मुंबई उपनगरात शौचालय बांधणे, तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबई उपनगरात किती शौचालये बांधण्यात आली, किती शौचालयांचे बांधकाम चालू आहे? याची विचारणा करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. लिंक रोड येथील मलनिस्सारण वाहिनी टाकण्यास का विलंब होत आहे?, हे काम लवकरात पूर्ण करण्याची, तसेच प्रस्तावित मलनिस्सारण वाहिन्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासह, विभागातील नाले पावसाळ्यापूर्वी साफ करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.