राज्यातील ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण
By admin | Published: January 11, 2017 04:33 AM2017-01-11T04:33:16+5:302017-01-11T04:33:16+5:30
राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे
पुणे : राज्यातील १४९ साखर कारखान्यांतून २७३.६३ लाख टन ऊस गाळपातून २९१.१७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आत्तापर्यंत ४६ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
यंदाच्या हंगामात ८७ सहकारी व ६२ कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. ऊसाची उपलब्धता कमी असल्याने यंदाचा हंगाम जेमतेम नव्वद ते शंभर दिवस चालेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापुरातील २८ सहकारी व ११ खासगी साखर कारखान्यांतून ९९.१० लाख टन ऊस गाळपातून ११६,४३ लाख टन साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ११.७५ टक्के आहे. पुणे विभागातील २८ सहकारी व २४ खासगी कारखान्यांतून १०६.११ लाख टन ऊस गाळपातून १११.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १०.४६ टक्के साखर उतारा मिळाला. अहमदनगर येथील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांतून ३४.२२ लाख टन ऊस गाळपातून ३२.५० लाख क्विंटल साखर उत्पादित झाली असून, सरासरी साखर उतारा ९.५० टक्के इतका मिळाला.
औरंगाबाद येथील १७ सहकारी व खासगी कारखान्यांनी १९.३० लाख टन ऊस गाळपातून १६.७५ लाख क्विंटल उत्पादन झाले असून, ८.६८ टक्के साखर उतारा मिळाला. नांदेड येथील ११ कारखान्यांतून ९.८९ लाख टन ऊस गाळपातून ९.६५ लाख क्विंटल, अमरावतीतील ३ कारखान्यांतून २.४३ लाख टन ऊस गाळपातून २.३७ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. नागपूर येथील ४ कारखान्यांतून २.५७ लाख टन ऊस गाळपातून २.४५ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यंदा राज्याचा सरासरी साखर उतारा १०.६४ टक्के इतका आहे. (प्रतिनिधी)
सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तर जेमतेम आठ ते १५ दिवस चालले. कोल्हापूरातील दोन, पुणे १८, अहमदनगर नऊ, औरंगाबाद व नांदेड प्रत्येकी सात, तर अमरावतीतील तीन कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.