संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 06:08 PM2017-01-30T18:08:25+5:302017-01-30T18:08:25+5:30

केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे.

To complete debt waiver, before the Sevagram Ashram, | संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 30 - केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करीत अनेक आंदोलने करण्यात आली. आंदोलनादरम्यान संबंधितांना निवेदनेही देण्यात आली. परंतु या मागणीवर कुठलीही ठोस भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी शेतकरी नेते शरद जोशी प्रेणीत भारत उत्थान कार्यक्रम अंमलात आणण्यात यावा, जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपविण्यात यावे, ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक आणि प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यात याव्या, विदेशातून आयात होत असलेल्या शेतमालावर बंदी घालण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पूर्ण दाबाची २४ तास वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेले विद्युत देयक तसेच कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी शेती व्यावसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विविध पक्षातील  राजकीय पुढारी व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सेवाग्राम आश्रमात सादर केले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशीकर, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, सतीश दाणी यांनी केले. आंदोलनात शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी झाले सहभागी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया यासह महाराष्ट्रातील जळगाव, परभणी आदी जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी भजन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.

सरकारला जागविण्यासाठी काढणार रॅली
सरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती रॅली काढण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सदर आंदोलनादरम्यान लोकमतशी बोलताना सांगितले. 

Web Title: To complete debt waiver, before the Sevagram Ashram,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.