सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण
By Admin | Published: January 9, 2015 12:38 AM2015-01-09T00:38:08+5:302015-01-09T00:47:31+5:30
तारकर्ली-मालवण सज्ज : २९ ते ३१ जानेवारीत विविध कार्यक्रमांची रेलचेल, समित्यांची स्थापना लवकरच
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ जानेवारी रोजी तारकर्ली-मालवण येथे ‘सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०१५’ भरविण्यात आले असून प्रशासनाच्यावतीने पूर्वतयारी सुरु झाली आहे.
महोत्सवाच्या कार्यक्रमाची रुपरेषाही निश्चित झाली असून यामध्ये विविध स्थानिक लोककला कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. हा पर्यटन महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात स्वच्छ निर्मल समुद्र चौपाट्या, निळाशार समुद्र, हिरवीगार भातशेती, निसर्गसौंदर्याने नटलेली अनेक स्थळे, किल्ले, ऐतिहासिक शिल्पे आदी पर्यटनाच्या दृष्टीने पोषक गोष्टी आहेत. महोत्सवातून या ऐतिहासिक व पर्यटन वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जगभर प्रसिद्धी व्हावी ही या महोत्सवामागची संकल्पना आहे.
मालवण येथील हा ‘पर्यटन महोत्सव’ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येणार असून यामध्ये शोभायात्रा समिती, निवास व्यवस्था समिती, वाहतूक व्यवस्था समिती, स्टॉल समिती, स्वयंसेवक समिती, प्रसिद्धी समिती, स्वागत समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, निधी महोत्सव समिती, खाद्य महोत्सव समिती, सुरक्षा समिती, हस्तकला, चित्रकला, रांगोळी प्रदर्शन समिती, सिंधुदुर्ग माहिती पुस्तिका प्रदर्शन समिती, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, सर्वसमावेशक समिती अशा एकूण १५ समित्यांचा समावेश आहे. या समित्यांवर संबंधित जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
१० हजार पर्यटक येणार
महोत्सवाच्या या कालावधीत किमान ५ ते १० हजार पर्यटक येतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महोत्सवासाठी येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्ती, उच्चस्तरीय अधिकारी, कलाकार, साहित्यिक, खेळाडू यांची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
५०० स्वयंसेवक नेमणार
महोत्सव काळात जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता त्यांना मार्गदर्शन करणे, पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था करणे, कार्यक्रम ठिकाणी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यासाठी २०० ते ५०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
संभाव्य कार्यक्रमांची रुपरेषा
२९ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते ३ या दरम्यान पर्यटन महोत्सव प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रम, ७ ते रात्री १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम.
३० जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २०० पर्यटकांची पॅकेज टूर, सायंकाळी ५ ते सायंकाळी ७.३० या दरम्यान गीत दुर्गायन कार्यक्रम, सायंकाळी ७.३० ते ८.३० या दरम्यान नेहरू युवा केंद्रातर्फे युवा महोत्सव.
३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २०० पर्यटकांची पॅकेज टूर, सायंकाळी ५ ते ६ पर्यटन महोत्सव समारोप. यावेळी समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्वात उत्कृष्ट फोटोग्राफी, नौकानयन, निवास न्याहरी, टूर आॅपरेटर, वाळूशिल्प स्पर्धा, खाद्यसंस्कृती यांना पारितोषिक वितरण, रात्री ७ ते ९ यावेळी स्थानिक लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.