भिडे वाड्यातील स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करा, राज ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 08:00 AM2023-01-04T08:00:39+5:302023-01-04T08:00:56+5:30
पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील जिथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, पण या स्मारकाची गणना आणखी एक रखडलेले स्मारक यात होऊ नये. सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीपर्यंत हे स्मारक तयार व्हावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.
पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तयारीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानाच, वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडे वाड्यात रोवली. त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा सरकारने या अधिवेशनात केली, त्याचे स्वागतच, पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते, हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पाहा, असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.