संपूर्ण टोलमुक्तीच हवी
By Admin | Published: May 20, 2015 12:58 AM2015-05-20T00:58:17+5:302015-05-20T00:58:32+5:30
कृती समितीची बैठक : पर्याय स्वीकाराल तर कडेलोटाची शिक्षा : एन. डी. पाटील
कोल्हापूर : केवळ एमएच ०९ च्या वाहनांना १ जूनपासून टोलमुक्त करण्याचा पालकमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून संपूर्ण टोलमुक्तीच हवी, त्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा सूर टोलविरोधी कृती समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत उमटला. यासंदर्भात येत्या शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ ची हाक देण्याची मागणीही अनेक वक्त्यांनी केली. मात्र, त्यासंदर्भात आज, बुधवारी पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत जाहीर करण्यात आले.
१ जूनपासून कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. मात्र, त्यावर घूमजाव करीत केवळ एमएच ०९ या वाहनांनाच टोलमुक्त करण्याचा शासनाचा विचार आहे. तशी अधिसूचना काढण्यात येणार आहे. असे असले तरी संपूर्ण टोलमाफीला आम्ही बांधील आहोत, असे त्यांनी सोमवारी प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह कृती समितीच्या नेत्यांशी चर्चेत सांगितले होते आणि विरोध मागे घेण्याचे आवाहन केले होते. कृती समितीच्या नेत्यांनी त्यांना कोणतेच आश्वासन न देता मंगळवारी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार ही बैठक झाली.
तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत विविध पक्ष व संघटनांच्या ३६ कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत संपूर्ण टोल रद्दच झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. आजच्या बैठकीला कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठी होती.
टोलमुक्त कोल्हापूरच्या लढ्याचे दायित्व स्वीकारलेल्या कृती समितीचे आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारचे दोर आता तुटलेले आहेत. टोलला पर्याय स्वीकारणे म्हणजे जनतेच्या अस्मितेला धक्का पोहोचविण्या-सारखे आहे. जर पर्याय स्वीकारला तर जनता कडेलोटाचीच शिक्षा देईल, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी या बैठकीत बोलताना दिला.
कोणत्याही पर्यायावर आज आम्ही चर्चा करणार नाही. संपूर्ण टोलमुक्ती झाली पाहिजे, ही जनतेची मागणी आहे. आम्ही या भूमिकेशी आजही ठाम आहोत. ज्या जनतेच्या विश्वासावर आम्ही लढा उभारला, तिचा विश्वासघात करून संपूर्ण टोलमुक्तीचा नारा आम्ही सोडून दिला, तर जनता पुढे कधीही आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. उलट ती आम्हाला खड्यासारखे बाजूला करील, अशी भीतीही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली.
परिणाम भोगावे लागले
टोल रद्दसाठी ठाम आहोत म्हणून राज्यकर्ते पर्याय घेऊन आले आहेत. हा पर्याय आताच कसा आला, पूर्वी का आणला नाही? असा सवाल करीत प्रा. पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण सरकारने निर्णय घेतला नाही; त्यामुळे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. कोल्हापूरच्या एका मंत्र्याने टोलची पावती फाडली. त्याचीही त्याला किंमत मोजावी लागली; परंतु आम्ही लढ्याच्या मैदानावर ठामपणे उभे आहोत. त्यामुळे अंतिम विजय हा जनतेचाच असेल. राज्यसत्ता नमणार आहे. (प्रतिनिधी)
कर्जाचा बोजा महापालिकेवर नको
बैठकीला महानगरपलिकेचे उपमहापौर मोहन गोंजारे, परिवहन सभापती अजित पवार, सभागृहाचे नेते चंद्रकांत घाडगे, गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी गोंजारे यांनी रस्ते प्रकल्पाचा खर्च कर्जाच्या स्वरूपात महानगरपलिकेवर टाकू नये. तो आम्ही स्वीकारणार नाही, असे सांगितले.
‘कोल्हापूर बंद’चा निर्णय आज शक्य
टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी म्हणजेच येत्या शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ ची हाक देऊन निदर्शने करण्याची मागणी अनेक वक्त्यांनी केली. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तो आज, बुधवारी पुन्हा होणाऱ्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.