किल्ले रायगडावरील महादरवाजाचे काम पूर्ण

By admin | Published: December 28, 2016 01:41 AM2016-12-28T01:41:25+5:302016-12-28T01:41:25+5:30

हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवकालीन जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगड प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाचे काम भारतीय पुरातत्त्व

Complete the work of Mahadarvaja on the fort Raigad | किल्ले रायगडावरील महादरवाजाचे काम पूर्ण

किल्ले रायगडावरील महादरवाजाचे काम पूर्ण

Next

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि शिवकालीन जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगड प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाचे काम भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेले आहे. शिवकाळात जसे या महादरवाजाचे स्वरूप होते, हुबेहूब त्याच पद्धतीचा दरवाजा या ठिकाणी लावण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कारागीर दरबार सिंग यांनी दहा-बारा सहकाऱ्यांच्या मदतीने दोन महिने मेहनत घेऊन हा दरवाजा तयार केला. १६ फूट उंच आणि साडेदहा फूट रुंद असा हा सागवानी दरवाजा महादरवाजाच्या चौकटीत बसवण्यास दहा दिवसांचा कालावधी लागला. दरवाजा बसवण्याच्या कामात दरबार सिंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी व पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
पूर्ण सागवानी असलेल्या या दरवाजाचे डिझाइन शिवकालीन दरवाजाशी मिळतेजुळते आहे. शत्रूंच्या हत्तींनी धडक देऊन तो तोडू नये, यासाठी दरवाजाला टोकदार खिळे असत, तसेच खिळे या दरवाजाला लावले आहेत. पर्यटकांना आत-बाहेर जाण्यासाठी दरवाजाला छोटे कवाड ठेवले आहे. त्यामुळे दरवाजाला भारदस्त स्वरूप मिळाले आहे.
किल्ले रायगडावरील भवानी टोक हे अत्यंत धोकादायक ठिकाण आहे. तेथे जाण्यासाठी असलेला मार्गही अत्यंत असुरक्षित आहे. या मार्गावरून भवानी टोकाला जाणाऱ्या पर्यटकांना अनेकदा अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हे अपघात रोखण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या धोकादायक मार्गालगत लोखंडी रेलिंग बसवण्याचेही काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)

दरवाजा सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंत बंद
हा दरवाजा बसवण्याचे काम सुरू असतानाच तो सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सर्वत्र प्रसारमाध्यमांतून प्रसारित केली जात आहे.

- पुरातत्त्व कायद्यानुसार कोणत्याही संरक्षित वास्तूत सूर्यास्त ते सूर्याेदयापर्यंतच्या काळात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या कायद्याची पुरातत्त्व विभागाकडून अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्त्व विभागाने मात्र याबाबत अधिकृतपणे काहीच सांगितले नाही. त्यामुळे योग्य माहिती पुरातत्त्व विभागाने द्यावी, अशी मागणी शिवभक्तांकडून के ली जात आहे.

Web Title: Complete the work of Mahadarvaja on the fort Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.