नालेसफाईचे काम वारज्यात पूर्ण
By admin | Published: June 28, 2016 01:00 AM2016-06-28T01:00:52+5:302016-06-28T01:00:52+5:30
कर्वेनगर प्रभागातील नाले सफाईचे काम वेगाने पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वारजे : कर्वेनगर प्रभागातील नाले सफाईचे काम वेगाने पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावसाळा सुरू झाला की पुण्यामध्ये नाल्यांमध्ये, रस्त्यावर पाणी साठून नागरिकांची गैरसोय होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. नाल्यांमध्ये कचरा असल्यामुळे पाणी साठून राहते व रस्त्यांवर येते. त्यामुळे पाणी नागरिकांच्या घरात शिरणे, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरणे, डासांची पैदास होणे व परिणामी विविध रोगांचा प्रसार होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जायला लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाल्यांची सफाई करणे, दुरुस्ती करणे अत्यावश्यक असते. परंतु दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर अशा कामाची सुरुवात होते आणि नागरिकांची गैरसोय होते. कर्वेनगर प्रभाग मात्र याला अपवाद ठरला आहे.
प्रभाग ३० मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेविका भाग्यश्री दांगट यांच्या पुढाकाराने सर्व पावसाळी नाल्यांची तसेच पावसाळी जलवाहिन्यांची सफाई करण्यात आली आहे. यानिमित्त सहायक आयुक्त उमेश माळी व कैलास दांगट यांनी, नागरिकांनीदेखील आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावेत, नाल्यांमध्ये राडारोडा, कचरा टाकू नये असे आवाहन केले. आत पालिकेने या कामात किती ‘सफाई’ दाखवली आहे, याचा प्रत्यंतर पावसाने जोर धरल्याशिवाय येणार नाही.
सोसायटीतील कामे पूर्ण
मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालय ते कर्वेनगर चौक, स्टेट बँक नगरमागील नाला, मिलेनिअम शाळा ते कर्वेनगर चौक, आदित्य गार्डन सिटी, अतुलनगर, पॉप्युलरनगर, माई मंगेशकर हॉस्पिटल, राजयोग सोसायटी, ईशाननगरी, नादब्रह्म सोसायटी, समर्थ सोसायटी, हिल व्हू सोसायटी, रेणुकानगर इत्यादी परिसरातील नाल्यांची सफाई करण्यात आली.