महावितरणच्या जागेत ३१८५ किलोवॅटचे ४ सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण
By appasaheb.patil | Published: July 30, 2019 07:02 PM2019-07-30T19:02:44+5:302019-07-30T19:05:08+5:30
वीज बचतीसाठी प्रयत्न; कृषीपंपांना शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेला गती
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कृषीपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, महावितरणकडून स्वत:च्या उपकेंद्राच्या जागेत उभारण्यात येणाºया ३१८५ किलोवॅट (९.५ मेगावॅट) क्षमतेचे ४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ३१८५ किलोवॅटचे चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राज्यातील एकूण वीज वापरातील ३० टक्के विजेचा वापर कृषीक्षेत्रासाठी होत आहे. कृषीपंपांना सद्यस्थितीत दिवसा आणि रात्री वीजपुरवठा केला जातो. राज्यातील शेतकºयांची दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी आहे. परंतु वीज वितरण यंत्रणेतील वहन क्षमतेचा समतोल राखण्यासाठी एकाचवेळी राज्यातील सर्वच कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. अशा प्रकारची योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या योजनेमुळे कृषीपंपांना दिवसा व माफक दरात शाश्वत वीज उपलब्ध होणार आहे. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त सहकार्याने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून शासकीय, गावठाण, शेतकºयांच्या खडकाळ व पडीक जमिनी आदी ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु आहे.
जिल्ह्यात या ठिकाणी उभारले प्रकल्प़...
च्सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वीज बचतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत़ वीज बचतीसाठी ग्राहकांचे समुपदेशन, जनजागृती, प्रचार व प्रसार करण्यात येत आहे़ वीजबचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी (ता. द़ सोलापूर) १४१४ किलोवॅट, शिरवळ (ता. अक्कलकोट) ५०९ किलोवॅट तसेच पंढरपूर लिंक रोड ५९२ व भंडीशेगाव ६७० किलोवॅट (ता. पंढरपूर) असे एकूण ३१८५ किलोवॅटचे चार सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
विजेचा वापर शेतकºयांसाठीच...
- शेतकºयांना दिवसा विजेचा पुरवठा व्हावा या उद्देशाने महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यात सध्या ४ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. रात्रीऐवजी शेतकºयांना दिवसभर वीजपुरवठा करण्याचा मानस महावितरणने व्यक्त केला असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले़
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे जिल्ह्यातील महावितरणच्या उपकेंद्र परिसरातील जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे़ आतापर्यंत चार प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे उर्वरित पाच प्रकल्प लवकरच पूर्ण होतील़ याठिकाणी तयार होणारी वीज शेतकºयांच्या विद्युतपंपासाठी वापरण्यात येणार आहे़ शेतीपंपाला २४ तास विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे़
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण़