मुद्रण कलेला ९७५ वर्षे झाली पूर्ण
By Admin | Published: February 24, 2016 03:01 AM2016-02-24T03:01:31+5:302016-02-24T03:01:31+5:30
मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारीला झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर
- जयंत धुळप, अलिबाग
मुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारीला झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये खरंतर मुद्रण पद्धतीचा शोध लागला, त्यानंतर आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात कोणत्याही क्षेत्रात झाली नाही इतकी प्रचंड गतीने प्रगती मुद्रण कला आणि पद्धती यामध्ये झाली आहे.
चीनमध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा यांचा समावेश होता. मुद्रण प्रतिमा कोरून तयार केलेल्या पृष्ठांची असे. बौद्ध धर्मातील काही विचार, मजकूर म्हणून संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवलेले असत.
जेव्हा यात्रेकरू अशा ठिकाणी जात तेव्हा या कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. यातूनच चीनमध्ये मुद्रण प्रतिमेद्वारे मुद्रणाचे तंत्र सापडले.
सहाव्या शतकानंतर या संगमरवरी दगडाच्या जागी लाकूड आले. दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणे अधिक जास्त सोपे आणि सोयीस्कर होत. इ. स. १०४१-४८ दरम्यानच्या कालखंडात बी शंग नावाच्या चिनी किमयागाराने मुद्रणासाठी खिळ्यांची संकल्पना आणण्याचा प्रयत्न केले.
इसवी सन १४३४-१४३९ या कालखंडात जर्मनीतील ऱ्हाइनलँडमध्ये योहानेस गुटेनबर्ग यांनी धात्वलेखी मुद्रण प्रकाराचा शोध लावला आणि तोच मुद्रण कलेतील मोलाचा दगड ठरला. गुटेनबर्ग यांनी मुद्रा, मातृका आणि शिशाचा एकत्रित वापर करून टिकाऊ अशी सुटी अक्षरे तयार केली. या सुट्या अक्षरांचा सामूहिक संच वापरून मुद्रणाचे तत्र त्यांनी निर्माण करून, गुटेनबर्ग यांनी ४० पानांचे बायबल छापले.
गुटेनबर्ग यांनी पुढे योहान फुस्ट यांच्याबरोबर जर्मनीमध्ये माइनत्स येथे मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. १४५५ मध्ये गुटेनबर्ग यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावून मुद्रण कालावधीत घट करण्यात यश मिळवले. १८८० नंतर अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले.
1870मध्ये अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. त्यात शिलामुद्रण पद्धतीची कामे होत असत. १९१६ मध्ये तो छापखाना बंद पडला. इ. स. १९५४ मध्ये तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात एकूण १० मुद्रणालये होती. ३१ मार्च १९८१च्या सरकारी नोंदी प्रमाणे जिल्ह्यात ९३ छापखाने होते. त्यातील सर्वाधिक ३० छापखाने हे अलिबागमध्ये होते.